सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी गुजरातचा दाैरा करावा : सचिन नलवडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गुजरातमध्ये साखर कारखाने ऊसाला चार हजाराच्या पुढे दर देतात. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यानी गुजरातचा एखादा अभ्यास दौरा काढून ते कारखाने एवढा कसा देतात, हे शिकून घ्यावे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी दिली जाते. तसेच तीन हजार रुपयाच्या पुढे ऊस दर दिला जात आहे. मग सातारा जिल्ह्यातच उस दर कमी का दिला जातो, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी जिल्ह्यातील साखर कारखांदारांना उपस्थित केला आहे.

पार्ले येथे रयत क्रांति संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस दर जनजागृती बैठक पार पडली. यावेळी पार्ले बनवडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीची एफआरपी 2800 रुपयेच्या आसपास मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. खते, लागवड, बी- बियाणे मंजूरी, शेती मशागतीचा खर्च गेल्या 5-6 वर्षात दुप्पट- तिप्पट झाला आहे. ऊस दर मात्र कमी- कमी होवू लागला आहे. त्यामुळे ऊस शेती तोट्यात जात आहे. शेतीच्या उत्पादनाचा घर खर्चाचा मेळ बसत नाही. साखर कारखाने साखर उतारा कमी दाखवून शेतकऱ्यांच्या उसाला कमी भाव देत आहेत. साखर कारखाने मळी, बगँस, मॉलीशेस, एथेनॉल, विज निर्मिती इत्यादी सारख्या उपपदार्थातून मिळणाऱ्या उतपन्नाचा हिस्सा शेतकऱ्यांना दिला जात नाही.

जोपर्यंत ऊसदर जाहीर नाही, तोपर्यंत ऊसतोड नाही
बैठकीत पार्ले येथील शेतकऱ्यांनी एकरकमी एफआरपीच्या घोषणा दिल्या. येणाऱ्या काळात संघटनेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत कारखाने ऊस दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत ऊस तोड न घेण्याचा व ऊस वाहतूक करू न देण्याचा निश्चय शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.