हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 5300 कोटींचे पॅकेज ही निव्वळ धुळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्या टिकेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच प्रसिद्धी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. मंत्री पाटील म्हणाले की, फडणवीस यांच्या टीकेला काही अर्थ नाही. सरकारने गोरगरिबांसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे, त्याचा लोकांना संचारबंदीच्या काळात फायदाच होणार आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती अतिशय बिकट असून संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मध्यमप्रतिनिधींशी आज संवाद साधला. तसेच यावेळी नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरू नका. अन्यथा, पोलीस कारवाई करतील, असा इशाराही दिला आहे.
ते पुढे म्हणाले, राज्यात आज रात्रीपासून 1 मेपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यातूनही वाहतूक प्रवास करता येईल. मात्र, विनाकारण बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वेळेची टाळेबंदी आणि आत्ताचे संचारबंदी यामध्ये फरक आहे. मात्र लोकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे.