हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी… लोकसभेच्या महाराष्ट्राच्या महानिकालात भाजपचे पानिपत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेलं हे धक्कादायक स्टेटमेंट… खरं म्हणजे महायुतीत 28 जागा पदरात पाडून निवडणुकीला लीड करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना कमळाच्या चिन्हावर अवघ्या नऊ उमेदवारांना विजयाचा गुलाल लावता आला…45 प्लसचं स्वप्न पाहून निकालाची वाट पाहणाऱ्या महायुतीची गाडी अवघ्या १७ जागांवर गुंडाळली.. अर्थात या सगळ्याचं खापर फडणवीसांवर फुटणं स्वाभाविक होतं आणि ते फुटलं देखील… या निकालामुळे फडणवीसांच्या भाजपातील राजकारणातील सुर्य मावळणार हे तर जवळजवळ निश्चितय. पण पराभवाची जबाबदारी घेत सरकारमधून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करुन फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत… आता हे पक्षी नेमके कोणते आहेत? आणि फडणवीस यातून कुणाला घायाल करु पाहतायत? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
फडणवीसांनी मोकळं करण्याच्या वक्तव्यातून पहिला पक्षी मारलाय तो दिल्लीतून त्यांच्यावर असणाऱ्या दबावाचा… खरं म्हणजे शिंदेंना शिवसेनेतून फोडून आपल्यासोबत घेतलं तेव्हापासूनच आपल्याला सरकारच्या बाहेर राहून पक्ष संघटनेचं काम करायचंय, असा फडणवीसांचा सूर होता. पण दिल्लीतून दबाव टाकून सत्तेत सहभागी व्हायला लावल्यामुळे फडणवीसांना नाईलाजाने उपमुख्यमंत्री व्हायला लागलं.. सिएम टू डेप्युटी सीएम असा उलटा प्रवास करायला लागल्यामुळे फडणवीसांची इमेजही बरीच डागाळली होती. त्यात दोन पक्ष फोडण्याच्या जनतेचा सगळा राग फडणवीसांवरच फुटत असल्यानं आता पक्ष संघटनेत जात पडद्याआड लपून काम करण्याची संधी त्यांना चालून आलीय. राजकारणात फडणवीसांना लाँग टर्म खेळायचं असेल तर या निगेटीव्ह वातावरणात फडणवीसांच्या फायद्याचं काय ठरणार असेल तर ते म्हणजे शांत राहून राजकारणात एक्टीव्ह राहणं… लोकसभेच्या पराभवाचा सगळा ब्लेम आपल्यावर घेत फडणवीसांनी त्यादिशेने एक पाऊल टाकलंय, असं म्हणायला हरकत नाही.
सरकारमधून मोकळं होण्याचं स्टेटमेंट करुन फडणवीसांनी मारलेला दुसरा पक्षी आहे तो विनोद तावडेंच्या समांतर राजकारणाला शह देण्याचा… २०१४ चा विचार केला तर राज्यात भाजपच्या पहिल्या फळीतील मोठं नाव म्हणून विनोद तावडेंकडं पाहीलं जात होतं. मात्र तावडेंना ओव्हरटेक करत फडणवीस पुढे निघून गेले… यानंतर फडणवीसांनी स्वत:च राजकारण सेफ करण्यासाठी स्पर्धेतल्या नेत्यांचा पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरु केला.. अर्थात यात तावडेंचं नाव सर्वात टॉपला होतं. फडणवीसांनी आपल्या फेवरमधल्या नेत्यांना बळ दिल्यामुळे तावडे पक्षात आपोआप साईडलाईन झाले.. पण तावडेंनी शांत राहात हळूहळू पक्ष संघटनेची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली… तावडे पुढे महामंत्री झाले…तावडेंच्या शब्दाला दिल्लीत मोठा मान मिळू लागला… लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात तावडेंनी पुन्हा आपली माणसं पेरायला सुरुवात केली… अर्थात फडणवीसांसाठी हा रेड सिग्नल होता… त्यामुळे वेळीच पक्ष संघटनेत जाऊन स्वत: ची पोजिशन सेट करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तावडेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी फडणवीसांनी अगदी सगळ्या बाबींचा विचार करुन हे स्टेटमेंट केलंय…
सरकारमधून मोकळं होण्याचं स्टेटमेंट करुन फडणवीसांनी मारलेला शेवटचा पक्षी आहे तो विधानसभेच्या पॉवर पॉलिटिक्सच्या केंद्रस्थानी जाण्याचा… भाजपने सर्वेंचा हवाला देत अनेक जागा आपल्याकडे वळत्या करून घेतल्या. एवढंच नाही तर शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला जागा सोडण्यामध्येही यामुळेच बराचसा विलंब झाला… या सगळ्याचा परिणाम आता सगळ्यांच्या समोर आहे.. महाराष्ट्राच्या जनतेने या फोडाफोडीच्या राजकारणाला सपशेल तोंडावर आपटलंय, असे आकडे सांगतायेत. पण लोकसभेच्या परफॉर्मन्सवर विधानसभेला जागा सुटतील असा महायुतीचा आधीच फॉर्मुला ठरल्यामुळे कमी जागांवरच गुलाल लागल्याने भाजपची मोठी कोंडी होणार आहे.. शिंदे आणि अजित पवार हे आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी प्रेशर क्रिएट करतील, हे स्पष्टच आहे…तेव्हा लोकसभेचे गणित चुकलं तरी विधानसभेलाही भाजपकडून आपल्यालाच लीड करण्याची इच्छा असल्याचं अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी ही मागणी करून बोलून दाखवलय… अर्थात आमदारकीचं तिकीट वाटप, कुणाला कुठून कोणत्या जागा सोडायच्या याचा कंट्रोलच फडणवीसांना पुन्हा एकदा सरकारमधून मोकळ होऊन मिळणार आहे…
एकूणच काय तर पराभवाची जबाबदारी स्वीकारतानाच पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी इमोशनल गेम कसा खेळायचा? हे शिकावं तर फडणीसांकडूनच…हेच या सगळ्यातून आपल्याला शिकता येऊ शकतं…बाकी मी पुन्हा येईन पासून सुरू झालेला फडणवीसांचा प्रवास मला मोकळं करा…पर्यंत येऊन थांबलाय…या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.