सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,
बेळगावच्या सत्तर वर्षीय माजी आमदार पत्नीने सांगलीतील एका नर्सिंग होममध्ये २०१६ साली मुलाला जन्म दिल्याची माहिती पुढे येत आहे. सांगली महापालिकेने तसा जन्माचा दाखला दिल्याचा आधार घेत माजी आमदाराच्या सुनेने पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे.
सासूसासर्यांनी आपल्या मयत पुत्राच्या हिश्शाच्या स्थावर मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने आपल्याला पुत्रप्राप्ती झाल्याची नोंद करुन घेतली असल्याचा दावा तिने तक्रारी अर्जात केला आहे. बेळगावच्या एक माजी आमदार आणि त्यांच्या पत्नी विरुध्द पंढरपूरात राहणार्या सुनेने सांगली पोलिसांत तक्रार अर्ज दिल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांसी संपर्क साधला असता त्यांनी असा एक तक्रार अर्ज आला आहे. त्यामुळे आपल्याला अपत्यप्राप्ती झाल्याची खोटी नोंद घातल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.
सांगलीतील एका नर्सिंग होममध्ये प्रस्तूती झाल्याची नोंद असलेला जन्मतारखेचा दाखला महापालिकेने दिल्याचे कागदपत्रांवरुन दिसत आहे. त्यामुळे संबधित कागदपत्रांच्या आधारे सखोल चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बेळगावातील एका माजी आमदाराच्या चिरंजीवाचे लग्न पंढरपूरातील एका राजकीय राजकीय घराण्यातील तरुणीशी सुमारे आठ वर्षांपूर्वी झाले होते. दोन वर्षाच्या संसारानंतर ती माहेरी पंढरपूर येथे रहात आहे. दरम्यानच्या काळात माजी आमदार पुत्राचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मयत पतीची आपण थेट वारसदार असतानाही आपल्याला स्थावर मालमत्तेच्या हिश्श्यापासून दूर ठेवण्यासाठी सासूसासर्यांने आपल्याला अपत्यप्राप्ती झाल्याची नोंद घातली आहे, असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. तिच्या या तक्रारीची चौकशी करुन पोलिस कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.