हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “तुझसे नाराज नही जिंदगी” या सुप्रसिद्ध गाण्याचे बंगाली गायक आणि तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार अनुप घोषाल यांचे निधन झाले आहे. अनुप घोषाल यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनुप घोषाल यांनी 1983 साली आलेल्या मासूम चित्रपटातील तुझसे नाराज नही जिंदगी या गाण्याला आपला आवाज दिला होता. या गाण्यामुळेच अनुप घोषाल यांची प्रसिद्धी वाढत गेली. परंतु अखेर आज वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
अनुप घोषाल यांना वयाशी संबंधित आजारामुळे कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान दुपारी 1.40 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनूप घोषाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी, “अनुप घोषाल यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राला मोठं नुकसान झालं आहे” अशा शब्दात शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, अनुप घोषाल यांनी मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रात देखील काम केले. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत अनुप उत्तरपारा मतदारसंघातून विजयी झाले होते. ते तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार देखील होते. त्यांनी अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये गाणी गायले. ‘गुपी गायन, बाघा बायन’, ‘हिरक राजार देशे’ (1980) या सत्यजित रे यांच्या चित्रपटांना आपला आवाज दिला. तसेच त्यांनी तपन सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात गाणी गायली. इतकेच नव्हे तर, अनुप घोषाल यांना 2011 मध्ये ‘नझरूल स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2013 साली ते संगीत महासन्मान पुरस्काराचे मानकरी ठरले होते.