नवी दिल्ली । स्वीडनची रहिवासी आणि ‘नोबल पुरस्कार’ विजेती १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी भावना भडकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर ग्रेटाने प्रत्युत्तरात एक ट्विट केलं आहे. माझ्यावर कोणत्याही धमकीचा काहीही फरक पडणार नाही. माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील, असं ग्रेटाने म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात १५३ ए, १२० बी सहीत आणखीही काही कलमांखाली एफआयआर दाखल केली आहे. ग्रेटा थनबर्गने ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतातील शेतकरी शांतेत आंदोलन करत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. कोणताही द्वेष, धमकी माझी मानवी हक्कांबाबतची ही भूमिका बदलू शकत नाही, असं ट्विट ग्रेटाने केलं आहे.
I still #StandWithFarmers and support their peaceful protest.
No amount of hate, threats or violations of human rights will ever change that. #FarmersProtest— Greta Thunberg (@GretaThunberg) February 4, 2021
ग्रेटासहीत प्रसिद्ध पॉपस्टार रिहाना, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि प्रथितयश वकील मीना हॅरिस यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सोशल मीडियावरून पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलनावर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन बुधवारी जाहीर करण्यात आलं.
‘यामागे काही हितसंबंधीय गट असून देशाच्या काही भागातील अवघ्या काही शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील सुधारणांबाबत शंका आहेत. या आंदोलनाबद्दल घाईघाईत प्रतिक्रिया देण्याआधी हा विषय समजून घेणं आवश्यक आहे’, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं. सोबतच, #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही तयार करून ते वापरण्यात आले. भाजपशी संबंधित अनेक नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून हे हॅशटॅग सोशल मीडियावर वापरले जात आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.