हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी नफा मिळवण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग जळगाव जिल्ह्यातील वरखेडे येथील एका शेतकऱ्यांने केला असून त्याला याचा चांगलाच मोबदला मिळाला आहे. शेतकरी डॉ. संभाजी चौधरी यांनी आपली केळी थेट इराण, इराक आणि इतर परदेशातील राज्यांमध्ये विकली आहे. यामुळे त्यांना स्थानिक पातळीपेक्षा जास्त भाव परदेशी बाजारपेठेत मिळाला आहे. सध्या त्यांच्या या परदेशी विकल्या जाणाऱ्या केळीची चर्चा संपूर्ण वरखेडे गावात होत आहे. यासोबतच, इतर शेतकऱ्यांनी देखील संभाजी चौधरी यांच्याकडून परदेशी बाजारात माल कसा विकायचा याबाबत सल्ले घेण्यास सुरुवात केली आहे.
शेतकरी संभाजी चौधरी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तीन एकर क्षेत्रावर जैन टिश्यू कल्चरची साडेचार हजार झाडांची लागवड केली होती. सुरुवातील त्यांनी जैन टिश्यूच्या रोपांची काळजी कशी घ्यावी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच यानंतर व्यवस्थितपणे संपूर्ण वर्षभराचे नियोजन करून घेतले. यावर्षी त्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या कापणीला सुरुवात केली. संभाजी चौधरी यांची केळी दर्जेदार असल्यामुळे त्यांच्याशी श्रीक्रिष्णा फूड कंपनीने संपर्क साधला. तसेच, त्यांच्याकडून केळी खरेदी करण्यास सुरुवात केली. यामुळे चौधरी यांना 200 ते 300 रुपयांचा जास्त फायदा होऊ लागला.
पुढे, कंपनीचे डिव्हिजनल मॅनेजर प्रमोद चौगुले व एरिया मॅनेजर तुषार चौधरी यांनीही केली परदेशात विकण्याचा विचार केला. तसेच यासंदर्भात चौधरी यांच्याशी संवाद साधला. दोन्ही बाजूने निर्णय झाल्यानंतर चौधरी यांची केळी मुंबई जहाजाने इराण, इराक या देशांमध्ये रवाना करण्यात आली. याचा फायदा असा झाला की, फक्त दोन दिवसात सुमारे दोनशे क्विंटल केळी वरखेडे येथून थेट परदेशात रवाना करण्यात आली. आता कंपनी चौधरी यांची केळी इतर देशात देखील विकण्याची तयारी दाखवत आहे. इराण, इराकमध्ये या केळीला चांगला दर मिळत असल्यामुळे भारतीय शेतकऱ्याला याचा मोठा फायदा होत आहे.
दरम्यान, संभाजी चौधरी यांचा परदेशात केळी पाठवण्याचा प्रयोग फायदेशीर ठरला आहे. त्यामुळेच याविषयी माहिती देताना, “शेतकरी शेती परवडत नाही म्हणून रडत बसतो. मात्र अशावेळी त्याला योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अंदाज घेणे महत्त्वाचे असते. जर या दोन्ही गोष्टींचे व्यवस्थितपणे नियोजन झाले तर शेतीमध्ये नक्कीच फायदा मिळू शकतो. तसेच, योग्य मोबदला मिळाल्यामुळे शेतकरी देखील आनंदी राहील” असे संभाजी चौधरी यांनी म्हणले आहे.