उस्मानाबाद | मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली तर काही भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी पेरणी केली त्यांच्या पिकाला सध्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यात यंदा पावसाने चांगली सुरूवात केली असली तरीही मोजक्याच भागात पाऊस झाला. त्यामुळे अनेक जिल्हयात पेरणी झाली नाही. उस्मानाबाद तालुक्यात आतापर्यंत 21 टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांची सध्या पेरणीची आणि पेरलेल्या पिकांना पाणी मिळण्यासाठी पावसाची वाट बघणे सुरु आहे.
यंदा शेतकऱ्यांनी तुरीऐवजी उडदाला पसंती दिली आहे. यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली होती पण, पेरणीनंतर पिकांना पाणी कुठून देणार याची चिंता लागून आहे. पावसाने ठरावीक भागातच हजेरी लावल्याने फक्त काही भागातच पेरण्या झाल्या. उस्मानाबादच्या काही भागात पेरणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला नसल्याने या भागातील पेरण्या झाल्या नाहीत. खरीप हंगामातील उसाचे आणि कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वगळता गुरुवारपर्यंत खरिपाच्या 33 हजार 680 हेक्टर क्षेत्रा पैकी सात हजार 132 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच फक्त 21 टक्के पेरणी झाली आहे.
खरीपाच्या उत्पन्नावर सण, वार, मुलांचे शिक्षण अन् लग्नाचेदेखील नियोजन शेतकऱ्यांकडून केले जाते. पण पेरणी झाली नसल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिके चांगली तरारून आली आहेत. काही भागाला पेरणीसाठी तर कुठे उगवून आलेल्या पिकाला मोठ्या पावसाची गरज आहे.