सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सागरेश्वर अभयारण्यातील वन्यजीव अभयारण्या बाहेर पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहेत. यातच या अभयारण्या परिसरात बिबट्याचा वावर देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करन्यासाठी वन विभागाला वारंवार तोंडी आणि लेखी तक्रार देऊनही यावर काहीही उपाय करण्यात आला नाही म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचे आंदोलन केले. मात्र जि.प गटनेते मा.शरद लाड यांच्या शिष्टाईने आणि वन विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सागरेश्वर अभयारण्यामधील हरणे, सांबर, तरस, काळवीट यासारखे प्राणी कुंपणाबाहेर पडत आहेत आणि येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहेत. याबाबत वारंवार वनविभागाला तक्रार देऊन यावर कोणतीच ठोस उपाय करण्यात आला नाही यातच या ठिकाणी बिबट्याचेही आगमन झाले आहे. या बिबट्याचे अभयारण्याबाहेर शेतकऱ्यांना वारंवार दर्शन होत आहे ज्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर काही शेतकऱ्यांनी बिबट्याच्या भीतीने शेती करणे सोडून दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान देखील होते आहे.
याबाबत वनविभागाला वारंवार कळवण्यात आले आहे. मात्र असे असूनही वन विभागाकडून कोणतीच ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही. ज्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. आज मोठ्या प्रमाणात शेतकरी तयारीने आंदोलन स्थळी दाखल झाले. शरद लाड यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत वन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. यांनतर वन अधिकाऱ्यांनी कुंपन करण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगत त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल असे म्हंटले. त्यावर शरद लाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा मी स्वतः शेतकऱ्यांसोबत हजर राहील. त्यानुसार २७ जानेवारीला या ठीकाणी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बैठक घेऊन यावर कायमचा तोडगा काढण्याचे ठरले.