सातारा प्रतिनिधी|सकलेन मुलाणी
जनता सहकारी बँकेत संचालक मंडळाने आपसात संगणमत करून बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरत आठ खातेदारांच्या नावे सुमारे 310 कोटी रुपयांची बोगस कर्ज प्रकरणे तयार करून बॅंकेला गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत राजेंद्र गणपती पाटील वय 50 राहणार वृंदावन कॉलनी मलकापूर यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात सुमारे 37 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात बँकेचे सर्व संचालक कर्मचारी खातेदार व हा हा गैरव्यवहार लपविण्यात मदत करणाऱ्या दोन चार्टर्ड अकाउंटंट समावेश करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, 9 नोव्हेंबर 2017 रोजी कराड जनता बँकेच्या कामकाजावर रिझर्व बँकेकडून निर्बंध घालण्यात आले. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कराड जनता सहकारी बँकेच्या कारभाराबाबत पत्रकार परिषद घेऊन गैरव्यवहार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याच दरम्यान राजेंद्र गणपती पाटील यांनी कराड येथील न्यायालयात संबंधित बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत दावा दाखल केला होता. माननीय न्यायालयाकडून याबाबतच्या पुराव्यांची पडताळणी करून कराड शहर पोलीस ठाण्याला कराड जनता बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी तपास करून गुन्हा नोंद करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते.
1962 सालापासून कराड जनता सहकारी बँक कार्यरत आहे. तिचे 32 हजार 166 इतकी सभासद संख्या आहे. 620 कोटी रुपयांच्या ठेव इतर 384 कोटी रुपयांची कर्ज आहेत. नुकताच या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यानंतर आठ दिवसात न्यायालयाकडून आदेश होऊन कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे बँकेचे ठेवीदार सभासद हवालदिल झाले आहेत.