मटका व्यवसायात वडीलांचा मृत्यू; मुलगा जिद्दीने MPSC तून अधिकारी बनला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कित्येकदा आजूबाजूचे वातावरण एखाद्या गोष्टीसाठी पूर्णतः प्रतिकूल असते. अशावेळी अनेकजण ती गोष्ट करण्याचा केवळ विचार करत बसतात. पण कृती काही होत नाही. कित्येकांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण असे खूप कमी लोक असतात जे यातून आपली स्वतःची वाट निर्माण करतात. आणि ईप्सित स्थळी जाऊन पोहोचतात. अशीच गोष्ट आहे विक्रांत जाधव यांची. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी त्यांची ही कथा आहे. वडील मटका व्यावसायिक, आजूबाजूचे वातावरण ही फारसे पोषक नाही. अशा परिस्थितीत विक्रांत यांच्या वडिलांनीच आपल्या मुलांच्या मनात अधिकारी होण्याचे स्वप्न पेरले. आणि आज विक्रांत नायब तहसीलदार झाले आहेत. पण दुर्दैवाने आपल्या मुलाला अधिकारी झालेले पाहायला त्यांचे वडील आता हयात नाहीत.

स्वतः मटका व्यवसायात असले तरी त्यांनी कधीच त्याचा आपल्या मुलांवर, घरच्या वातावरणावर परिणाम होऊ दिला नाही. मुलांवर सातत्याने चांगले संस्कार होण्यासाठी ते धडपडत राहिले. वडिलांची धडपड पाहूनच कॉमर्स मधून पदवी घेऊन सुरुवातीला वकिली करू पाहणाऱ्या विक्रांत यांनी केवळ वडिलांच्या इच्छेसाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्यास देखील सुरुवात केली. सुरुवातीला एकदा अपयश आल्यानंतर मात्र आणखी जोमाने त्यांनी प्रयत्न सुरु केले. आणि २०१८ साली भटक्या विमुक्त जाती प्रवर्गामधून त्यांची पहिल्या क्रमांकावर निवड झाली. पण एवढ्यावर थांबणे त्यांनी पसंद केले नाही. आणखी मोठ्या पदासाठी प्रयत्न चालूच ठेवले. पण अचानक ५ नोव्हेंबर २०१८ रोजी मटका व्यवसायातून त्यांच्या वडिलांचा खून झाला. पण विक्रांत यांनी धीर जाऊ दिला नाही. अवघ्या चार महिन्यातच त्यांनी मंत्रालयात सहायक कक्षाधिकारी म्हणून निवड झाली. पण हे पाहायला ज्यांनी हे स्वप्न त्यांच्यात पेरले ते वडील हयात नव्हते.

आई आणि लहान भावाच्या प्रोत्साहनाने त्यांनी आणखी मोठ्या पदासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. आणि त्यादृष्टीने तयारीला लागले. नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे. पण ते इतक्यावर समाधानी नाही आहेत. पुढे जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी पदासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे आयुष्यात एखाद्या छोट्याशा नकारात्मक घटनेमुळे हरलेले अनेक तरुण असताना विक्रांत यांचा हा नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडचा प्रवास लक्षणीय आहे. कोणत्याच प्रकारचे क्लासेस न लावता केवळ जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या त्रिसूत्रीवर आज हे यश त्यांना मिळाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.