भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये बाप आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या बापानेच आपल्या मुलाची हत्या केली आहे. भिवंडी तालुक्यातील कशिवली या गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सख्या बापाने मुलाच्या मदतीने आपल्या मोठ्या मुलाची हत्या केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ कचरू पाटील असे हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर कचरू गोविंद पाटील व गणेश कचरू पाटील अशी अटक केलेल्या वडील व भावाची नावे आहेत. धामणगाव कशिवली या गावातील काशिनाथ पाटील व त्यांचे वडील कचरू पाटील व भाऊ गणेश यांच्यात मागील वर्षभरापासून जमिनीच्या वाटणी वरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी मृत काशीनाथ पाटील व त्यांचा मुलगा धनंजय असे शेतावर जळणासाठी लाकूडफाटा जमा करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी काशीनाथ पाटील यांचे वडील कचरू व भाऊ गणेश हे तिथे आले आणि ‘यापूर्वी तू जीवानिशी वाचला पण आता नाही वाचू शकणार’ असे बोलून शिवीगाळ केली तसेच मारहाणसुद्धा केली.
यानंतर गणेश याने पुतण्या धनंजय याच्यावर कुऱ्हाडीसह लाठीकाठीने हल्ला करत त्याला जखमी केले. त्यावेळेस वडील काशीनाथ मुलाच्या बचावासाठी पुढे आले असता वडील कचरू यांनी कुऱ्हाडीने मुलाच्या डोक्यावर वार करून जखमी केले आणि त्यानंतर वडील व भावाने काशीनाथ यास मारहाण करून जबर जखमी केले. यानंतर मुलगा धनंजय याने जखमी रक्तबंबाळ झालेल्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर धनंजय याने आजोबा कचरू पाटील व काका गणेश पाटील यांनी आपल्या वडिलांची हत्या केल्याची तक्रार भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी हत्येसह जबरी मारहाण केल्याप्रकरणी बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बारोट या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.