सातारा शहरात घरगुती वादातून मुलाकडून वडिलांचा खून

Crime D
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | किरकोळ कारणातून घरगुती वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या मुलाने वडिलांना मारहाण करत धारदार चाकूसारख्या हत्याराने भोसकल्याने वडिलांचा मृत्यू झाला आहे. सातारा शहरातील मंगळवार पेठेत ही घटना घडली असून मुलावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बबन पांडुरंग पवार (वय- 56, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सूरज पवार (वय- 28) असे संशयित मुलाचे नाव आहे. याप्रकरणी राजू पवार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बबन पवार हे त्यांचा मुलगा सूरज याच्यासोबत वास्तव्य करत होते. तक्रारदार राजू पवार हे त्यांचे शेजारी आहेत. बबन पवार व सुरज पवार यांच्यामध्ये घरी वाद सुरु असताना ओरडण्याचा आवाज ऐकून तक्रारदार राजू पवार हे बबन पवार यांच्या घरात गेले असता सुरज त्याच्या वडिलांना मारहाण करत होता. राजू पवार यांनी बाप-लेकामधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

बाप-लेकामधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या सुरज पवार याने घरातील धारदार चाकू घेवून वडिलांवर वार केला. या घटनेत गंभीर जखमी अवस्थेतील बबन पवार यांना राजू पवार यांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र बबन पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.