हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे FBI ने छापेमारी केली आहे. दरम्यान, याबाबत FBI कडून या छापेमारीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अॅप ट्रुथ सोशल नेटवर्कवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
सध्या अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर अनेक मोठ्या नेत्यांसह डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. जानेवारी महिन्यात ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊसवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एफबीआयकडून तपास सुरु केला आहे. दरम्यान, 2020 साली निवडणुकीत पराभव झाल्यानंतर व्हाईट हाऊस सोडताना ट्म्प यांनी कागदपत्रांनी भरलेले 15 बॉक्स आपल्या सोबत नेले. ही कागदपत्रं फ्लोरिडामधील मार-ए-लागो रिसॉर्टमधून हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा येथे छापेमारी करण्यात आली आहे.
छापेमारीबाबत ट्रम्प काय म्हणाले?
FBI कडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अॅप ट्रुथ सोशल नेटवर्कवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘अमेरिकेसाठी काळा दिवस आहे. कारण माझ्या फ्लोरिडा येथील पाम बीचवरील ‘मार-ए-लागो’ या घरी एफबीआयच्या पथकाने छापेमारी केली आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मी 2024 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शर्यतीत उभे राहू नये म्हणून मला फसवण्यासाठी ही विरोधकांची खेळी आहे.’