हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नुकताच ९ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला मराठी चित्रपट ‘डिलिव्हरी बॉय’ प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतो. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि MHJ फेम पृथ्वीक प्रताप यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी आधीच चांगला प्रतिसाद दिला होता. यानंतर आता चित्रपटाला देखील भरभरून प्रेम देत आहेत. नुकताच या चित्रपटाच्या प्रीमियर नाइटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात हा चित्रपट पाहून एका महिलेला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं असं काय झालं आणि ही महिला इतकी भावुक झाली?
लुसिया एंटरटेनमेंट प्रॅाडक्शन निर्मित, सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या विकेण्डला अनेक ठिकाणी या चित्रपटासाठी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकले. दरम्यान प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम चित्रपटगृहांना भेट देते आहे. त्यामुळे अभिनेत्री अंकिता लांडे पाटीलने एका चित्रपटगृहाला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधला आणि यावेळी एक अशी गोष्ट घडली जी पाहून सगळेच भावनिक झाले.
अंकिता प्रेक्षकांशी संवाद साधताना अनेकांनी ही कथा भावल्याचे सांगितले. तर काहींनी आपले अनुभव सांगितले. इतकेच काय तर, काही महिला चित्रपट पाहून अगदी भावुक झाल्या आणि काहींना अश्रुही अनावर झाले. याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओत महिला ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट पाहताना भावुक झालेल्या दिसत आहेत. यावेळी अभिनेत्री अंकिता लांडे पाटीलने पुढे जात त्या महिलेला सावरलं आणि तिचा अनुभव जाणून घेतला. हसता हसता पटकन डोळ्यांत पाणी आणणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे.
सरोगसीवर भाष्य करणाऱ्या या कथेचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक मोहसीन खान यांनी केले आहे. अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री अंकिता लांडे पाटील यांनी आपापल्या भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारल्या आहेत. म्हणूनच ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत.