सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एकरकमी एफआरपी देत असताना खाली जिल्ह्यातील कारखानदारांकडून ठेंगा दाखवला आहे. याविरोधात शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या तिरडी मोर्चा पोलिसांनी अडवला. पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. मोर्चामध्ये आक्रमक झालेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी देण्याच्या विरोधात पालकमंत्री जयंत पाटील कारखानदारांचे टोळके बनवले असल्याचा आरोप केला.
कारखानदारांचे मढं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर चाललो असताना पोलिसांनी त्याची विटंबना केली. या कृत्यामागे पालकमंत्र्यांचा हात असल्याबद्दल त्यांचा निषेध केला. मोर्चा संपल्यानंतर गनिमी काव्याने सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयार एकरकमी एफआरपीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीच्यावतीने राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जालींदर पाटील, सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून काही अंतरावर मोर्चा आला असता शेतकर्यांनी कारखानदारांची तिरडी बाहेर काढली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकर्यांनी तिरडी देण्यास विरोध दर्शविल्याने पोलिसांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या कारणांनी शेतकरी संतप्त झाले, शेतकर्यांनी तिरडी कोणत्याही परिस्थितीत न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस आणि शेतकर्यांमध्ये जोरदार झटापट झाली. या प्रसंगाने तेथे तणाव निर्माण झाला होता. काही वेळाने थांबलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला. पोलीसांनी कारखानदारांच्या तिरडीची विटंबना केल्याने राजू शेट्टी आक्रमक झाले.