बीड | तालुक्यातील कामखेडा गावाजवळील पवार तांड्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून कुऱ्हाडी आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.रात्री आठच्या सुमारास घडली. या हल्ल्याचा विडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल झाला.
या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेतील पाच जखमी रुग्णावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सुरेश पांडुरंग पवार (वय 32),संतोष विठ्ठल पवार (वय 36),सुनील बंडू पवार (वय 22),निलाबाई अंकुश आढे (वय 45), रमेश पवार (वय 25) अशी जखमींचा नावे आहेत.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, बीड तालुक्यातील कामखेडा गावातील पवार तांडयावर रात्री 8 वाजता ट्रॅक्टर घेऊन घराकडे चाललेल्या सुरेश पवार यांच्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून भावकीतील काही लोकांनी कुर्हाडी व कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पाच ते सहा जणांना देखील भांडणात जबर मार लागला आहे.
या तांड्यावरील सर्व कुटुंब पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडी करण्यासाठी जातात. जमिनी थोड्या असल्या कारणाने भावकितील लोकांमध्ये वाद निर्माण झाला. या भांडणात ऊस तोडणीसाठी वापरले जाणाऱ्या धारदार कोयत्याने मारहाण करण्यात आली. म्हणून भांडणात लोक गंभीर जखमी झाले आहेत.जून्या भावकीच्या वादातून हा प्रकार झाल्याची प्रथमदर्शी माहिती पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अद्याप या प्रकरणाचा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.