व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी ! आता होम आयसोलेशन बंद; उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये भरती होणे बंधनकारक – राजेश टोपे

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही.

रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे असा निर्णय घेतला आहे याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच आता कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात या निर्णयामुळे त्याला आळा बसेल असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

ग्लोबल टेंडरला प्रतिसाद नाही
लसीकरणासाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर सुरु केले होते. त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच केंद्र सरकारने लसी आयात कराव्यात आणि राज्यांना पुरवाव्यात, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यासाठी लागणाऱ्या लसीचे पैसे द्यायलाही राज्य सरकार तयार आहे असे राज्य सरकारने सांगितले आहे.

म्युकर मायकोसिसवर खाजगी रुग्णालयातही मोफत उपचार?
राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक होत असताना त्यामध्ये म्युकर मायकोसिस या रोगाने डोके वर काढले आहे. सध्या राज्यात म्युकर मायकोसिसचे 2245 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाकडून त्याला नोटीफाईड आजार घोषित करण्यात आले आहे. रुग्ण आणि त्याबाबतची माहिती शासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आजारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन औषधाचे नियंत्रण सध्या केंद्राकडे आहे. केंद्र सरकारने औषध दिल्यावर आपण त्याचे प्रत्येक जिल्ह्यात वाटप करतो. त्यामुळे रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर या आजारावर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच या आजारावर उपचार करण्यासाठी 130 रुग्णालये निश्चित करण्यात आले आहेत. सध्या 2245 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येत आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच खाजगी रुग्णालयातही या आजारावर मोफत उपचार व्हावेत किंवा शासनाने ठरवलेल्या दरात उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

त्या पैशातून जनजागृती
म्युकर मायकोसिसबाबत आम्ही जागरुक आहोत. याच्या रुग्णांत वाढ होऊ नये तसेच त्याचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. त्या दंडाच्या पैशातून म्युकर मायकोसिसची जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.