औरंगाबाद – आज औरंगाबादेत शिवसेनेच्या निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह मराठवाड्यातील सेनेचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या मेळाव्यानंतर शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
कार्यक्रमानंतर शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी झालेली पाहायला मिळाली. यापूर्वी अनेकदा शिवसेनेचा अंतर्गत वाद समोर आला आहे. आता औरंगाबादेतही तेच झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निश्चय मेळाव्यानंतर शिवसेनेच्या दोन गटांत जोरदार मारमारी झाली आहे. युवासेनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी भिडले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे वातावरण चांगलच तापले होते. काही वेळानंत वाद शांत झाला, पण यावरुन पुन्हा एकदा सेनेचा अंतर्गत वाद समोर आला आहे.
या राड्यानंतर शिवसेनेचे नेते राजेंद्र जंजाळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मारामारी करणारे आमचे कार्यकर्ते आहेत का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. आपसातील जुन्या वादातून हा प्रकार घडला असून, प्राथमिक माहितीप्रमाणे बजाजनगर ग्रामीण येथील हे कार्यकर्ते आहेत, अशी माहिती राजेंद्र जंजाळ यांनी दिली. तसेच मारामारी करणाऱ्यांची सगळी माहिती घेऊन कार्यक्रमाला गालबोट लावणाऱ्यांवर कारवाई केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.