जमिनीच्या वादातून नाशिकमधील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – माणसाकडे पैसे आले कि तो आपली सगळी रक्ताची नाती विसरतो आणि त्यांच्या जीवावर उठतो. याच घटनेचा प्रत्यय नाशिकमध्ये आला. यामध्ये पैसा आणि जमिनीचा तुकड्यासाठी रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. या घटनेत महिला आणि वृद्धांना बेदम मारहाण करण्यात आली. हि सर्व घटना मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात ही हाणामारीची घटना घडली आहे. या ठिकाणी जमिनीच्या तुकड्यावरून दोन गटामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. आज या वादातून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या हाणामारीत काही तरुणांनी महिला आणि वृद्धांना हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

महिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आले. तर एका तरुणाने हॉकी स्टिकने वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. यावेळी जखमी झालेल्या महिला मारहाण करणाऱ्यांकडे दया याचना करत होत्या. पण या तरुणांनी मारहाण सुरूच ठेवली. घरात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्नही या तरुणांनी केला. ही संपूर्ण घटना याच घरातील मुलाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे. या मारहाणीत वयोवृद्ध व्यक्तीला व महिलांना जबर मार लागला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like