कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे शेतीची नांगरट करायची नाही, या कारणावरून सहाजणांनी दोघांना कुर्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद भगवान बाळकृष्ण पवार (वय 53, रा. रेठरे कारखाना, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली असून, याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विजय बाबासो काशीद (खुबकर), राजेंद्र शंकरराव काशीद (पाटील), बाबासो संपत खुबकर, अजय बाबासो खुबकर (सर्व रा. जुळेवाडी, ता. कराड), किशोर बाळासो पाटोळे (रा. किल्लेमच्छिंद्रकड, ता. वाळवा), गणेश हजारे (पूर्ण नाव माहिती नाही) रा. गोंदी गावठाण, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अशोक पवार यांनी निवास रामचंद्र खुबकर यांनी रेठरे बुद्रुक येथील जोगळेकर मळा येथील 20 गुंठे जमीन ही 20 वर्षासाठी घाणवाट केली आहे. बुधवारी सकाळी 11.30 वाजेणेच्या सुमारास शेतजमिन ट्रॅक्टरने नांगरण्याकरीता फिर्यादी भगवान पवार व अशोक पवार गेले होते. त्यावेळी तेथे विजय काशीद, राजेंद्र काशीद, बाबासो खुबकर, अजय खुबकर, किशोर पाटोळे, गणेश हजारे यांनी येऊन शिवीगाळ करत नांगरत असलेले ट्रॅक्टर मालकास तु इथून ट्रॅक्टर बाहेर काढ. तुम्ही हे शेत नांगरायचे नाही, असे म्हणून सहाजणांनी भगवान पवार व अशोक पवार यांना शिवीगाळ केली.
त्यावेळी विजय काशीद याने कुर्हाडीचे दांड्याने भगवान पवार यांना मारहाण केली. त्याचवेळी राजेंद्र काशीद याने भगवान पवार यांची कॉलर पकडून तु आमचे शेत नांगरायचे नाही, असे म्हणून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी अशोक पवार हे भांडणे सोडविण्यास आले असता, बाबासो खुबकर याने अशोक पवार यांना खाली पाडून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत भगवान पवार यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंद कण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार एक्के करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा