नवी दिल्ली । सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांची नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. यावेळी चर्चेचे कारण म्हणजे या दोघांचा फोटो. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जॅकलिनने अशा कोणत्याही गोष्टीचा इन्कार केला आहे. चंद्रशेखर हा 200 कोटींच्या फसवणुकीतील मुख्य आरोपी आहे. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अभिनेत्री जॅकलिनचीही दीर्घकाळ चौकशी केली आहे.
जॅकलीन आणि सुकेशच्या या फोटोमध्ये चंद्रशेखर आणि जॅकलिन एकत्र दिसत आहेत. इंडिया टुडेच्या वृत्ताने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हा फोटो या वर्षी एप्रिल-जूनमध्ये काढण्यात आला आहे, जेव्हा चंद्रशेखर अंतरिम जामिनावर बाहेर आला होता. रिपोर्टनुसार, ED च्या सूत्रांनी सांगितले की, ” चंद्रशेखर हा चेन्नईमध्ये चार वेळा जॅकलिनला भेटला होता. यासोबतच त्याने या मीटिंगसाठी या अभिनेत्रीसाठी प्रायव्हेट जेटचीही व्यवस्था केली होती.”
कोण आहे सुकेश चंद्रशेखर?
कर्नाटकातील बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या चंद्रशेखरने वयाच्या 17 व्या वर्षी लोकांना फसवण्यास सुरुवात केली होती. त्याने बंगळुरू येथून आपल्या काळ्या कामांना सुरुवात केली, त्यानंतर काही वेळातच त्याने चेन्नई गाठली. यानंतर त्याने मोठ्या शहरांमधील अनेक श्रीमंतांना आपल्या फसवणुकीला बळी पाडले. चंद्रशेखरला बालाजी म्हणूनही ओळखले जाते. नोकरी मिळवून देण्याच्या अमिषाखाली त्याने आजपर्यंत अनेकांची फसवणूक केली. राजकारण्याचा नातेवाईक असल्याचे भासवून त्याने 100 हून जास्त लोकांची 75 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे.
चंद्रशेखरवर गुन्हे दाखल
2017 मध्ये, चंद्रशेखरला निवडणूक आयोगाच्या लाच प्रकरणात एका हॉटेलमधून अटक करून तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. एका निवडणूक चिन्हाच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी त्यांनी AIADMK (अम्मा) नेते टीटीव्ही दिनकरन यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. AIADMK (अम्मा) गटाला निवडणूक चिन्ह मिळवून देण्यासाठी त्याने 50 कोटी रुपयांची डील केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या अटकेच्या वेळी त्याच्याकडून 1.3 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. सुकेशला तिहार तुरुंगात ठेवण्यात आल्यानंतर लॉकअपमध्ये राहूनही तो कोट्यवधींच्या वसुलीचे रॅकेट चालवत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
नवीन प्रकरण काय आहे ?
खरं तर, फोर्टिसचे प्रमोटर शिविंदर सिंग यांच्या पत्नी आदिती एस सिंग यांच्या तक्रारीवरून हा नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 200 कोटींच्या फसवणुकीला बळी पडल्याचा आरोप तिने केला आहे. तिने सांगितले की,” एका कॉलरने स्वतःची ओळख कायदा मंत्रालयातील अधिकारी असे म्हणून केली होती आणि तिच्या पतीला जामीन देण्याचे आश्वासन दिले होते.” आदिती सिंगच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,”या प्रकरणाच्या तपासानंतर सुकेश चंद्रशेखर यामागील सूत्रधार असल्याचे आढळून आले आहे.”