सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद पुंडलिक पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू ब्रह्मदेव पुंडलिक पडळकर यांच्यावर फसवणुकीसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना हि २१ मार्च २०११ ते आज अखेर घडली.
याबाबत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, आटपाडी तालुक्यातील झरे येथे त्यांच्या मालकीची गट नंबर ६२४, ५५६ आणि ५५७ हि जमीन आहे. सदरची जमीन हि खरेदी करण्यासाठी संशयित ब्रह्मदेव पडळकर आणि गोपीचंद पडळकर यांनी समर्थता दर्शवली. वाघमारे आणि पडळकर यांच्यामध्ये ६ लाख २० हजार प्रमाणे जमिनीचा व्यवहार ठरला.
२१ मार्च ते २०११ ते आज अखेर जमीन खरेदी पत्राचे दस्त करून घेतला होता. त्यावेळी त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून १ लाख ६० हजार रुपये दिले व राहिलेली उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते. अनेक वर्षे उलटली तरी अद्यापही ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उर्वरित ४ लाख ६० हजार रुपयांची रक्कम पडळकर बंधूंनी अद्याप दिली नाही.
वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे वाघमारे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकर यांच्यावर फसवणुकीसह अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.