व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

माणिकचंद ‘ऑक्सिरिच’सारखे बनावट लेबल लावणार्‍या ‘ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

पुणे। नामांकित मिनरल वॉटर ’माणिकचंद ऑक्सिरिच’ या कंपनीच्या पाण्याच्या बाटलीवरील लेबलसारखे बनावट लेबल तयार करून पाण्याच्या बाटल्यांची विक्री केल्याप्रकरणी ’ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०२३ मध्ये वाकी खुर्द, चाकण येथे उघडकीस आला. याप्रकरणी माणिकचंद ऑक्सिरिच मिनरल वॉटर तयार करणार्‍या आरएमडी फुड्स अँड बेव्हरेजस या कंपनीच्या संचालिका शोभा रसिकलाल धारीवाल (68, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शोभा रसिकलाल धारीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्सिटॉप कंपनीचा मालक महेंद्र गोरे (रा. वाकीखुर्द, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, फिर्यादी शोभा धारिवाल यांना मे २०२३ 3 मध्ये आपल्या कंपनीच्या लेबल सारखे हुबेहूब लेबल असलेल्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री विविध ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी माहिती घेतली असता या बनावट पाण्याची बाटली महिंद्रा ऑक्सिटॉप कंपनीची असुन ही कंपनी आरोपी महेंद्र गोरे याची असल्याचे समजले.

यावर त्यांनी अधिक माहीती घेण्यासाठी व्यापार विभागाशी संपर्क साधला असता आरोपीने कोणतीही ट्रेड मार्क मान्यता घेतली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरोपी गोरे याची महिद्रा एन्टरप्रायजेस ही कंपनी उत्पादित करीत असलेल्या बाटलीवर जाणीवपूर्वक माणिकचंद ऑक्सिरिच कंपनी सारखे लेबल (अक्षरांची साईज, फॉन्ड व अक्षरांची ठेवण कलर) चिटकवून ग्राहकांची फसवणुक करीत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चाकण पोलिस करीत आहेत.