हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वारणावती (ता. शिराळा) येथील वन्यजीव कार्यालयाच्या शेजारी असलेल्या नरक्याच्या गोडाऊनला शनिवार दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या संशयास्पद आगीत करोडो रुपयांचा जप्त केलेला नरक्या व तीन वाहने जळून खाक झाली आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी दहा वनमजूर व वनपाल गारदी यांच्यासह ग्रामस्थांनी जिवाचे रान केले. सायंकाळी सातच्या दरम्यान अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर दाखल झाली. मात्र रात्रीच्या आठ वाजेपर्यंत तरी आग आटोक्यात आली नव्हती. रात्री उशिरापर्यंत वन्यजीव विभागाचे कोणीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर झाले नव्हते. चांदोली वन्य जीवचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांचेशी घटनास्थळावरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सुमारे पंधरा वीस वर्षापूर्वी येथे नरक्याच्या तस्करीचे प्रकरण उघड झाले होते. यामध्ये अंदाजे चार ते पाच हजार पोती नरक्या व सहा ट्रक,तीन ट्रॅक्टर,चार जीप, जप्त करण्यात आले होते. त्यापैकी जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल व घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचे तीन ट्रक यात जळुन खाक झाले हा मुद्देमाल वन्यजीव कार्यालयाच्या निगरानीत होता. हा करोडो रुपयांचा मुद्देमाल वन्यजीव कार्यालयाच्या शेजारील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. तस्करीच्या नरक्याचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व विशेषतः हा मुद्देमाल वन्यजीव कार्यालयाच्या कस्टडीत असताना ही आग लागल्याने सर्वसामान्यांमधून संशय व्यक्त केला जात आहे. वन्यजीव विभागाच्या निष्क्रियतेच्या बाबतीत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
चांदोली वन्यजीव परीसरातील कार्यालयाच्या शेजारील नरक्याच्या गोडाऊनला आग; ३ वाहने जळून खाक#Hellomaharashtra pic.twitter.com/nXTi29LlsL
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 2, 2023
सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर ३१७ चौरस किलोमीटर क्षेत्रात चांदोली राष्ट्रीय उद्यान व सध्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विस्तारले आहे. या परिसरात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. जगातील सर्वात अधिक वनौषधी वनस्पतींचा ठेवा येथे आहे. या परिसरामध्ये नरक्या ही वनस्पतीसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येते. राज्य सरकारने या वनस्पतीची नोंद दुर्मीळ वनस्पती म्हणून केली आहे. नरक्या वनस्पतीच्या तोडीला कायद्याने बंदी आहे. खासगी कंपन्या व विदेशी बाजारपेठांत कोट्यावधी रुपयांना ही वनस्पती विकली जाते. वनविभागाने या वनस्पतीचे संरक्षण करावे, असे शासनाचे स्पष्ट आदेश असताना वनविभागाच्या शेजारी असलेला करोडो रुपयांचा नरक्या दिवसाढवळ्या जळून खाक होतो. याला काय म्हणावे? असा प्रश्न सर्वसामान्यांनमधून व्यक्त होत आहे.