परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी जिल्हयातील पाथरी तालुक्यात भाजीपाल्याच्या गोडावूनला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत गोडावुनमधील भाजीपाला, कॅरेट आणि इतर फर्नीचर जळून खाक झाल्याने गोडावूनचे मोठे नुकसान झाले आहे.
पाथरी शहरातील माळीवाडा येथील भाजीपाला विक्रेते शाम उत्तमराव विरकर यांचे पाथरी शहरातील मेन रोडवर भाजीपाला विक्रीचे दुकान असून दुकानालगतच भाजीपाला साठवणूक करण्यासाठी भाडेतत्वावर गोडावुन केलेले आहे. या गोडावुनला गुरुवार दि.५ डिसेबर रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास अचानक आग लागली. योगायोग म्हणून एका कार्यक्रमास आणलेल्या पाण्याच्या टॅंकरने ही आग आटोक्यात आणण्यात नागरीकांना यश आले आहे.
ही आग लागली तेव्हा योगायोगाने पाण्याचा टँकरजवळ असल्याने आग लवकर आटोक्यात आली. अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हे गोडावून मेन रोडवर असल्यामुळे इथं वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. या घटनेत भाजीपाला व्यापाऱ्याचे जवळपास ४० हजाराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.