सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवकांची झुंबड मैदानाबाहेर पडली. यावेळी गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरून गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. सातारा शहरात मंगळवारी रात्री दोन गटात वाहन मागे घेण्यावरून दांडियावेळी वादावादी झाली. यानंतर त्याचे पर्यवसन थेट फायरिंगमध्ये झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. फायर करणारे पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका शाळेजवळ मंगळवारी रात्री दांडिया खेळताना युवकांच्या दोन गटात वादावादी झाली. यामुळे महिला, युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन तणाव वाढला. या घटनेनंतर दोन्ही गट पांगले. मात्र या घटनेतून मध्यरात्री पुन्हा थरकाप उडाला. काही संशयितांनी ढोणे कॉलनीत हवेत फायरिंग केले. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र यामुळे परिसर हादरून गेला.
शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना जिवंत राऊंड व पुंगळ्या सापडल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती. संशयित सातारा शहर परिसरातील असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दुचाकी पायावर घातल्याने आमिर शेख या संशयितांने फायरिंग केलं असल्याचं सांगण्यात येत असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसानी एक जणाला ताब्यात घेतल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले आहे.