सातारा जिल्ह्यात पहिली ईडीची कारवाई : एम. आर. देशमुख यांना अटक

सातारा | मायणी मेडिकल कॉलेजचे तत्कालीन चेअरमन एम. आर. देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. तसेच त्यांना ईडीने दि.18 मे पर्यंत कोठडी सुनावलेली आहे. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मायणी मेडिकल कॉलेजचे विद्यमान संचालक अरुण गोरे यांनी ईडीला दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या मेडिकल महाविद्यालयासाठी लागणार्‍या यंत्रसामुग्रीसाठी एचडीएफसी या बँकेतून तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे 15 कोटी रूपये कर्ज स्वरूपात घेतले. परंतु कोणत्याही प्रकारची खरेदी न करता संचालक मंडळाने बोगस बिले बँकेकडे सादर केली.

 

बँकेचे अधिकारी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये आले, तेव्हा कोणत्याही वस्तूची खरेदी झाली नसल्याचे उघडकीस आले.जेव्हा ही माहिती उघडकीस आली, तेव्हा मेडिकल कॉलेजचे संचालक मंडळ बदलण्यात आले होते. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाविषयी गैरसमज होवू शकतो म्हणून आपण ही तक्रार तत्कालीन संचालक मंडळाविरोधात देत असल्याचे गोरे यांनी म्हटले.