औरंगाबाद – राज ठाकरे साहेब येणार आहेत. त्यांची सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी इफ्तार पार्टीला यावे, असे आमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. आज औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना जलील म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे सणावर परिणाम झाला आहे. 99 टक्के लोक शांतता प्रिय असतात. लहान-मोठे व्यापारी सर्व जातीधर्मातील लोक आहेत. त्यांना भीती आहे. सभेमुळे काही अनुचित प्रकार घडेल. सरकार व प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करावे. मात्र जोर जबरदस्ती होऊ नये, असे मशिदींवरील भोंग्याच्या राजकारणावर जलील यांनी आपले मत नोंदवले. तीन पक्षांना हिंदूंचे रक्षण करणार कोण आहे ? असा प्रश्न पडला आहे. भाजप, शिवसेना आणि मनसे हे त्या स्पर्धेत आहेत. राज ठाकरे हे आपल्या अजेंड्यासाठी औरंगाबादला येत आहेत. त्यांच्या सभेमुळे काही अनुचित प्रकार तर होणार नाही ना याची चिंता धंदा, कारोबार करणाऱ्याला आहे. आम्ही शत्रू नाहीत. तुम्ही सभेपूर्वी इफ्तार पार्टीला यावे, असे आमंत्रण इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.
पोलिस विभागाला विश्वास द्यायला आलो होतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी खासदार म्हणून दिवाळीचा फराळ खायला जातो. मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देतो, की त्यांनी ईदच्या दिवशी ईदग्याजवळ यावे आणि एकमेकांना शुभेच्छा द्यावेत, असे आवाहन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना केले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या अजेंड्यानुसार काम करतो. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की एकता शहरात टिकून राहावी. आम्ही धर्म व जातीविरोधात बोललो नाहीत. कायद्यापुढे कोणीही मोठे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल (भोंग्यांबाबत) दिले आहे. त्याचे पालन करण्यासाठी एजन्सींची नियुक्त केली पाहिजे, असे ते म्हणाले.