हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी मल्याळम सिनेमामुळे चर्चेत आहे. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
या चित्रपटात सोनाली कुलकर्णी साउथचे सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला असून या फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आपल्या मनमोहक नृत्य अदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार असून महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता ती दक्षिणात्य चित्रपटातून गाजवणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल सोनालीने अनुभव शेअर केला आहे.
चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली कि, ‘हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे’.