रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आज पहिली बस होणार रवाना

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे.

एमपीएससी स्टुडंट्स राईट्स चे समन्वयक महेश बडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे विभागिक कार्यालयाकडे आठ दिवसांपूर्वी आम्ही पुण्यात अडकलेल्या जवळपास २५०० विद्यार्थ्यांची यादी दिली होती. त्यानुसार आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांतून आता या विद्यर्थ्यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज अहमदनगर साठी पहिली एस.टी. बस रवाना होणार आहे. पुण्य‍तील कंटेंनमंट झोन वगळता इतर भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांची आम्ही प्रशासनाला माहिती दिली आहे. त्यानुसार ज्या जिल्ह्यातून एमओसी येईल त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एस.टी. बस ची व्यवस्था करुन त्याची जाण्याची व्यवस्था करण्यात येत अाहे. विद्यार्थ्यांनी गोंधळ न करता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या फोनची वाट पहावी. जशी व्यवस्था होइल त्यानुसार सदर विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार आहे अशी माहिती बडे यांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यात सुमारे अडीच हजार विदयार्थी वास्तव्यास आहेत. राज्यात अडकलेल्यांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे. यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च  देखील सरकार करणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. 10 हजार एसटी बसेसने राज्यात अडकलेल्या लोकांना घरी पोहोचवणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितलले आहे. तसेच या प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांच्या वर अपेक्षित खर्च आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

You might also like