पुण्यात आधी ‘आफ्टरनून लाइफ’ सुरू करायला हवं – आदित्य ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज मंत्रिमंडळाने मुंबईत नाईट लाईफ सुरु करायला मंजुरी दिली. याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस त्यांनी मुंबई प्रमाणे पुण्यातही नाईट लाईफ सुरु करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी खुमासदार उत्तर दिले. पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरु करायला हवं, अशी मिश्किल टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना केली. पुण्यातील लोक दुपारी झोपतात असा समज प्रचलित आहे. याचा संदर्भ घेत आदित्य ठाकरे यांनी हे विधान केले.

आदित्य ठाकरे यांनीच पहिल्यांदा नाईट लाईफचा प्रस्ताव मांडला होता. प्रस्तावाविरोधात सरकारमधूनच सूर उमटत होते मात्र आज अखेर आदित्य ठाकरे यांच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची गरज व रोजगार निर्मितीची क्षमता लक्षात घेऊन आदित्य यांनी याबाबत आग्रह धरला होता. अखेर ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मीडियाला याची माहिती दिली. त्यावेळी पुण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मार्मिक उत्तर दिलं.