शाळेतील टीव्ही चोरी प्रकरणात कराड तालुक्यातील पाचजणांना पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | शाळेतील एलईडी टीव्ही चोरणारी टोळी कराड तालुका पोलिसांनी गजाआड केली. शेरे जिल्हा परिषद शाळेतून सहा एलईडी टीव्ही चोरणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवार दि. 19 रोजी रात्री ही कारवाई केली. संशयितांकडून पोलिसांनी 2 टीव्ही जप्त केले आहेत. संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
ऋतुराज संजय निकम (वय 20), अजिंक्य संजय गावडे (वय 19), रोहित अरुण सावंत (वय 19), धनराज बाबुराव मोटे (वय 25, सर्व रा. शेरे, ता. कराड) व आकाश प्रभाकर शेळके (वय 21, रा. कार्वे, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेरे येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीने जानेवारी 2020 मध्ये सहा एलईडी टीव्ही दिले आहेत. दरम्यानच्या कालावधीत शाळा बंद असताना संशयितांनी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये लावलेले टीव्ही चोरट्यांनी चोरून नेले. चोरलेल्या टीव्हीची कार्वे येथे दोन, तुळसण येथे एक, जत येथे एक अशी विक्री केली. तीन ऑगस्ट 2021 रोजी ही बाब लक्षात आल्यानंतर शाळेचे शिक्षक प्रकाश फल्ले यांनी याबाबतची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.

या तक्रारीवरून तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेरे येथील चार व कार्वे येथील एकाला अटक केली. त्यांना सोमवार दि. 20 रोजी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार, शशिकांत घाडगे, सचिन निकम तसेच धनंजय कोळी यांनी ही कारवाई केली. अधिक तपास मिलींद बैले करत आहेत.

Leave a Comment