हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाणे महापालिकेच्या एका रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली असून वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर लावला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमकाची भूमिका घेतली असल्याने रुग्णालयाच्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्थानिक नागरिक उपचारासाठी जात असतात. मात्र याच रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाकडून झालेल्या हलगर्दीपणामुळे तसेच वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णांच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच, उपचारासाठी दाखल झाल्यानंतर, फोन चार्जिंग चे 100 रुपये, आयसी बेडचे 200, ऑक्सिजन बेडचे 200 मागितले जात असल्याचे देखील कुटुंबियांकडून उघडकीस आले आहे.
या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच मनसेने रुग्णालयाविरोधात आक्रमणाची भूमिका घेतली आहे. या सर्व प्रकरणाचा आढावा घेत राष्ट्रवादी मनसेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला जाब विचारला आहे. तसेच या प्रकरणात सरकारने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी देखील विनंती करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चिघळण्याची शक्यता असल्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच, दंगल नियंत्रण पथकाला देखील बोलवण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यू झालेल्या पाच रुग्णांबाबत माहिती देताना रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे की, कुटुंबियांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. पाच पैकी ज्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला ते तिन्ही रुग्ण गंभीर अवस्थेत होते. त्याचवेळी, रुग्णालयातील आयसीयु फुल झाले होते. तसेच रुग्ण दाखल करण्याची क्षमता देखील संपली होती. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.