कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदी मजल मारली आहे. राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक तीने पटकावला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील मुलीने मिळवलेले हे यश तालुक्यासह सातारा जिल्ह्याची मान उंचावणारे आहे. घोणशीची कन्या ऐश्वर्याची गावातून वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली.
ऐश्वर्याचे माध्यमिक शिक्षण अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालय वाहागाव येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण एसजीएम (SGM College, karad) कॉलेजमध्ये झाले. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वाठार तर्फ वडगाव येथे तिचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. याहीपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या ऐश्वर्याने प्रबळ इच्छाशक्ती आई- वडील, मित्र-मैत्रिणींचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या बळावर राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक मिळवला. मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर मजल मारली आहे. या यशामध्ये तिचे वडील आनंदराव बाबुराव गुरव, आई अरुणा गुरव, तिची बहीण अपर्णा व ओंकार यांचे अनमोल योगदान लाभले.
घोणशी गावात ऐश्वर्याची वाजत- गाजत मिरवणूक
एमपीएससीमधून मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी या परीक्षेत घोणशी येथील ऐश्वर्या गुरव हिने मुलींमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल घोणशी गावात तिची वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली. ऐश्वर्याने एमपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्यानंतर ती नुकतीच घोणशी गावात परतली. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. तसेच गावाच्या वतीने तिचा सन्मानही करण्यात आला. ऐश्वर्याच्या या यशाबद्दल खासदार श्रीनिवास पाटील यांनी घोणशी येथे जाऊन ऐश्वर्या गुरव हिचा सन्मान केला.