व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महापूर २०१९ – संकटे दाही दिशा, जडली झुंजायाची नशा

विशेष लेख | मानसी निर्मळे, कृष्णात स्वाती

कोल्हापुरात २०१९ साली आलेल्या महाभयंकर पुरानंतर विविध सामजिक घटकांनी एकत्र येऊन मदतकार्य राबविले. त्याच प्रयत्नांची एक कहाणी..!!

२०१९ चा पावसाळा हा सर्वार्थाने लक्षात राहील तो म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत आलेला महापूर आणि या महापुराने घडवलेली वाताहत यांसाठी. केवळ चार – दोन दिवस नाही; तर तब्बल दहा दिवस अखंड कोसळणारा मुसळधार पाऊस, वेधशाळेचे सगळे अंदाज मोडीत काढत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या तुफान पावसामुळे धरणांतून करावा लागलेला पाण्याचा विक्रमी विसर्ग, त्यामुळे या पूर्वी येऊन गेलेल्या महापुरांनी निर्धारित केलेल्या पूररेषा ओलांडून वाहाणाऱ्या नद्या आणि या सगळ्याची परिणती म्हणजे शहर भागांसहित आजूबाजूच्या जवळपास ३९२ खेड्यांना, तिथल्या कृषिक्षेत्राला थोडे थोडके नाही, तर १० ते १२ दिवस पडलेला पुराच्या पाण्याचा वेढा. मुला-माणसांचे, जनावरांचे झालेले अतोनात हाल, शेतीचे न भरुन येणारे नुकसान, पडलेली घरे, वाहून गेलेले संसार, मुलांप्रमाणे जिवापाड जपलेली पण पुराच्या पाण्यात असहाय होऊन बुडून मृत्युमुखी पडलेली जनावरे. हे विदारक चित्र ओसरत गेलेल्या पुराच्या पाण्याबरोबर अधिकच भेसूर बनत गेले. या सगळ्यातून आलेले उद्ध्वस्तपण मोजण्यासाठी शासनाच्या सगळ्याच फुटपट्ट्या निकामी ठरल्या. नुकसान भरपाई कशाकशाची म्हणून देणार? हबकलेल्या, मोडलेल्या मनांना कसं सांधणार? फाटलेल्या आभाळाला कशाचे ठिगळ लावणार?

किरकोळ पुराच्या अंदाजाने काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन करू पाहणारी शासकीय यंत्रणा पुरेशा तयारीविना कोलमडून गेली. बाहेरून कोल्हापूरात येण्याचे सर्ब मार्ग बंद झाल्याने मदतीसाठी आलेली NDRF ची तुकडी आवश्यक त्या ठिकाणी वेळेवर पोहचू शकली नाही. दरम्यानच्या धाडशी तरुणाई आणि काही स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लोक शर्थीचे प्रयत्न करत होते. नैसर्गिक असो वा मानवनिर्मित संकटकाळात लोक जात, धर्म, वर्ग विसरून मानवतेच्या अत्युच्य भावनेने मदतीसाठी पुढे येतात तसे यावेळीही आले. गेल्या काही वर्षांत ताणले गेलेले जातीय, धार्मिक वातावरण, त्यांच्या टोकदार अस्मिता पुराच्या झटक्याने गळून पडून अवघ्या पुरक्षेत्रामध्ये मानवता हाच एकमेव धर्म आणि जात उरले. गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले तरीही पुढचे सहा, सात दिवस पूर आहे ती पातळी राखून होता.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून प्रत्यक्ष पूर वाढत असलेल्या काळात आपण फारसे काही करू शकत नव्हतो. तरीही आपले कोल्हापूर शहर प्रधान सचिव नियाज अत्तार, संघासेन जगतकर, महाराष्ट्र विवेकावाहिनीच्या न्यू कॉलेजचा भारतजीवन प्रभुदेसाई हे कार्यकर्ते अगदी पुराच्या पहिल्या दिवसापासून पुरात अडकलेल्या लोकांची पुरातून सुटका करणे त्यांना अन्न किंवा इतर जीवनावश्यक मदत पोहोचवणे अशा कामांत होते. कोल्हापूर शाखेचा राजवैभव शोभा रामचंद्र आणि गडहिंग्लज शाखेचा भास्कर सुतार हे त्रिदशक पूर्तीच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई येथे गेले होते. राजवैभवने मुंबईत बसून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करणे आणि होत असलेल्या मदतीचे संयोजन करण्यासाठी ‘पुराग्रस्त Help’ नावाचा whatas app ग्रुप सुरु केला. जिल्ह्यातील संपूर्ण पूर हटेपर्यंत या ग्रुपने आवश्यक ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी खूप महत्वाची कामगिरी पार पाडली.

या काळात महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर शहर शाखेने पूरग्रस्त गावांच्या सर्वेक्षणाचा एक आदर्श नमुना विकसित केला. यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली ती शनिवार दि. ७ ऑगस्ट रोजी न्यू कॉलेजच्या विवेकवाहिनी सदस्यांनी शहरात पूरग्रस्त नागरिकांसाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून. या विवेकवाहिनी सदस्यांनी पाच टीम बनवून सात ठिकाणी भेटी दिल्या. पुराग्रस्तांशी आपुलकीचा संवाद केला. एरव्ही अन्नपदार्थ, कपडे यांची मदत घेऊन जाणाऱ्यांच्या गर्दीत जवळ येऊन मायेने चौकशी करणारी ही तरुणाई त्या गर्दीत उठून दिसत होती. शहरात इंधनाचा तुटवडा असल्यामुळे या युवांनी सात निवारा केंद्रात पायी जाऊन ४५० ते ५०० पुराग्रस्त कुटुंबांशी प्रातिनिधिक संवाद साधला. यावेळी हे पूरग्रस्त निवारा केंद्रातील पूरग्रस्त नागरिक अन्न, ओषधे, वस्त्र या तत्कालीन गरजा पूर्ण होत असल्या तहीही नंतर घरी गेल्यावर मदतीचा हा ओघ असाच सुरु राहणार नाही अशावेळी पुराने वाहून गेलेले घर, संसार, खराब झालेले व्यवसायाचे साहित्य, महत्वाची कागदपत्रे पाहिल्यावर आम्ही काय करायचं? या प्रश्नाने व्यथित सर्वजण चिंतीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या सर्वेक्षणातूनच या विवेकसाथींनी केवळ पुराच्या काळात भावनिक होऊन भागणार नाही तर पूर ओसरल्यानंतर सुद्धा या लोकांशी आपुलकीने संवाद साधण्याचा आणि त्यासाठी मानासामित्र होण्याचा निर्धार केला. या सर्वेक्षणात यश आंबोळे, भारतजीवन प्रभूखोत, तेजश्री पाटील, सोनम पाटील, शामल पाटील, आदिनाथ पाटील, मिताली जमाल, वैभव सावंत, वैभव राऊत, आदिती निल्ले, वृषाली खोत, क्षितीज बनसोडे, ऋतुजा यादव, आशितोष पाटील, अनिकेत देसाई, जयगुरू चिले या विवेकसाथींनी सहभाग घेतला.

या युवा विवेकसाथींनी केलेल्या सर्वेक्षणातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र अंनिसच्या कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्यक्ष पुरक्षेत्रात जाऊन पाहणी करणे, पिडीतांच्या नुकसानीची माहिती घेऊन त्यांच्या गरजा समजून घेणे, राज्यभरातून आलेली मदत योग्य ठिकाणी पोहोचवणे यासाठी ग्राउंड झिरो रिपोर्ट मांडणारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत कोल्हापूर शहर शाखेच्या वतीने एखादे गाव दत्तक घेऊन तेथे काम करण्याचा विचार करण्यात आला. त्यासाठी करवीर तालुक्यातील आरे हे गाव निवडले आणि त्या गावी भेट दिली तेव्हा लक्षात आले की तेथे बऱ्यापैकी मदत पोहोचते आहे आणि तेथील लोकांनी एक सर्व पक्षीय समिती बनवून त्या मदतीचे योग्य वितरणदेखील होते आहे. त्यांचे काम आम्हाला आवडले. राजवैभव याने सामाजिक माध्यमांवर या भेटीचा लिहिलेला अहवाल, त्यात कार्यकर्त्यांच्या भेटीच्या केलेल्या नोंदी लोकांना आवडला. त्यामुळे केवळ मदत पोहोचवण्यापेक्षा पूरग्रस्त गावांना भेटी देऊन जिथे मदतीची खरी गरज आहे अशा व्यक्ती, घरे यांविषयी वास्तव माहिती मदत देऊ करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे जास्त आवश्यक वाटले. त्यामुळे नंतरच्या टप्प्यात हळदी, हालोंडी, इंगळी, रुई, या ग्रामीण भागातील तर सिद्धार्थ नगर, बापट वसाहत, शाहुपूरी कुंभार गल्ली या कोल्हापूर शहरातील भागांत स्वतः फिरून सर्वेक्षण केले तर चंदूर, बस्तवाड, कारदगा या गावांतील सर्वेक्षण तेथील सहकाऱ्यांकडून करून घेतले. यामध्ये गावाचे नाव, कोल्हापूर पासून अंतर, प्रवासाचा मार्ग, लोकसंख्या, आपद्ग्रस्त कुटुंबांची संख्या, पडलेल्या घरांची संख्या, धोकादायक घरांची संख्या, पुरकाळात आपद्ग्रस्तांची व्यवस्था केलेले ठिकाण, सर्वेक्षणाच्या वेळेपर्यंत मिळालेली मदत, मदत वितरण करण्याची पद्धत, पुढच्या काळात आवश्यक मदत, गावातील एकल महिलांची संख्या, आपद्ग्रस्त शालेय विद्यार्थ्यांची संख्या अशा महत्वाच्या बाबींची माहिती घेतली जायची. शेवटी गावाला भेट देणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे आणि नंबर दिलेले असायचे. ही माहिती सोशल मिडीयावर प्रसारित केली जायची. त्यामुळे ज्यांना मदत द्यायची आहे त्यांना नेमकी कुठे काय मदत पाहिजे आहे, ती कशी पोहोचवता येईल याचा अंदाज यायचा. लोक कार्यकर्त्यांना संपर्क करायचे. या कार्यपद्धतीमुळे राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमधून फोन करून मदत आणली गेली. ती संबंधितांच्या मार्फतच गरजू लोकांपर्यंत पोहोचवली गेली.

ग्रामीण भागात ओढ्यालगत आणि नदीकाठी असणाऱ्या वस्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घरांची पडझड आणि प्रापंचिक साहित्याचे नुकसान झालेले आढळले. शालेय आणि महाविद्यालयीन मुलांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान मोठे होते. बहुतांश मागासवर्गीय समाजातील लोकांपर्यंत पोहोचलेली मदतही अत्यल्प होती. या आपत्तीमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या माणसांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे, हे आमच्या लक्षात आले. म्हणूनच प्रत्येक पीडीत कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या. गावात येणारी मदत आपसांत गरजे प्रमाणे सामंजस्याने वाटून घेण्यासाठी स्थानिक तरुणांनी या कामात पुढाकार घ्यावा, समन्वय समिती नेमावी, असे आवाहन केले. मदतीची नितांत गरज असणाऱ्या कुटुंबांची तपशीलवार नोंद केली. मदतीचा ओघ मोठा होता. त्या मदतीचे समन्यायी वाटप होणे गरजेचे होते. त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, गावकामगार तलाठी या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गावची स्वच्छता स्थानिक तरुणांनी श्रमदानातून करावी, तसेच मदत म्हणून मिळालेल्या सामानाचे गरजेनुसार वितरण होण्यासाठी समन्वय समिती नेमली जावी, पडलेल्या घरांचे पंचनामे त्वरीत व्हावेत, अशा सूचनाही केल्या.

या सर्वेक्षणानंतर महत्त्वाचा टप्पा हा बाहेरून मिळालेल्या मदत साहित्याचे वितरण हा होता. आम्ही गोळा केलेल्या तपशिलानुसार अत्यंत गरजू, उपेक्षित अशा समुदायांकडे लक्ष केंद्रित केले. साधारणतः पाच सदस्य असलेल्या प्रत्येक कुटुंबाला किमान आठ दिवस पुरेल इतका शिधा, अत्यावश्यक निवडक कपडे, स्वच्छतेचे साहित्य, सॅनिटरी नॅपकिन्स, अंथरुण अशा जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार केले. यादीनुसार प्रत्येक कुटुंबाला पोहोचते केले. शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. काही ठिकाणी मेडिकल कँप लावले. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील विविध संस्था, संघटना, मंडळे, व्यक्ती यांनी दिलेले साहित्य तसेच महाराष्ट्र अंनिसच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी दिलेले साधारण त्रेचाळीस हजार रुपये उपयोगी पडले. सर्वेक्षण, साहित्य संकलन आणि वितरणाच्या या कामात नियाज अत्तार, राजवैभव कांबळे, यश अंबोळे, प्रांजल जगजंपी, संघसेन जगतकर, कपिल मुळे, रेश्मा खाडे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथून सुट्टीसाठी आलेली मानसी निर्मळे, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी खास लांजा (जि. रत्नागिरी) हून आलेला सुहास शिगम, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, वडघर (जि. रायगड) येठीन आलेले सतीश शिर्के आणि कृष्णात स्वाती यांनी मदत केली.

कोल्हापूर भाग हा सुपीक जमीन, मुबलक पाणी आणि संपन्न दुग्ध व्यवसायांसाठी ओळखला जातो. पुरामुळे सुपीक अशा मातीचा थर वाहून गेला आहे. यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होऊन नजीकच्या भविष्यात पिकांच्या उत्पादनात घट होऊ शकते. पीककर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागेल. दुभती जनावरे पोसण्यासाठी चाऱ्याची कमतरता भासू शकते. पडलेली घरे बांधण्यासाठी पैसा कमी पडू शकतो. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांवर अधिकच हालाखीची परिस्थिती ओढवू शकते. पैशाअभावी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या गळतीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. एकूणच या आपत्तीमुळे खचलेल्या मनांना नैराश्याच्या खाईत जाण्यापासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पूरग्रस्त भागातील लोकांशी सातत्याने संपर्कात राहून, ‘मानसमित्र’ हा एक संवाद उपक्रम राबवण्याचे महाराष्ट्र विवेकावाहिनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत पीडीतांना आपुलकीने संवाद साधत त्यांच्याही नं कळत त्यांच्या भावनिक जखमांवर प्रेमाची फुकार मारण्याचा प्रयत्न केला जाईल. एका अर्थाने भावनिक प्रथमोपचारच म्हणा ना! आवश्यक वाटले तर व्यावसायिक तज्ज्ञांकडून समुपदेशन, किंवा मानसोपचार उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी न्यू कॉलेज येथे मानसिक आरोग्य विभागाचे कार्यवाह डॉ. हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत न्यू कॉलेज, शिवाजी विद्यापीठाचा समाज कार्य विभाग, महावीर महाविद्यालय आणि काही स्वयंसेवी संस्था आणि महाराष्ट्र अंनिस चे कार्यकर्ते मिळून ७४ कार्यकर्ते उपस्थित होते. या कामासाठी आणखी एक समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. हमीद दाभोलकर यांना पूरग्रस्त क्षेत्रात मानसिक आरोग्याविषयी मदत पुरवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. म्हणजेच एका अर्थाने महाराष्ट्र शासनाने आपला मानसमित्र उपक्रम स्वीकारला म्हणायला हरकत नाही.
महाराष्ट्र अंनिस, कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी “संकटे दाही दिशा, जडली झुंजायाची नशा” हे शब्द एका वेगळ्या परिप्रेक्षामध्ये पुन्हा एकदा खरे करून दाखवले.

शब्दांकन – मानसी निर्मळे (९५०३२२६१९१), कृष्णात स्वाती (८६००२३०६६०)