नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लसीकरणा संदर्भात. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन होणं आणि लस नागरिकांपर्यंत पोहोचनं महत्त्वाचं मानलं जात आहे. आता स्थानिक पातळीवर लसींच्या निर्मितीचा प्रस्ताव करण्याबाबत विचार सुरू आहे. स्थानिक पातळीवरील करोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांची बोलणी सुरू आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव हर्षवर्धन शृंगाला यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया विभागाच्या एका मंचावर ते बोलत होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन शृंगाला म्हणाले, ‘भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहे. कोरोना प्रतिबंधासाठी जागतिक पातळीवरील विविध घटकांशी चर्चा करून या परिस्थितीशी कसे लढता येईल याचा विचार करत आहे. फायझर, जॉन्सन अंड जॉन्सन,मॉडर्ना या लसींचे भारतात उत्पादन करता येईल का याबाबतही विचारणा करण्यात आली आहे. स्पुटनिक व्हीचे उत्पादन भारतात करण्याबाबतही सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू आहे. लसींचा पुरवठा होण्याची साखळी अतिशय गुंतागुंतीची आहे. महत्त्वाच्या कंपन्यांसोबत व्यूहात्मत भागीदारीवर आमचा भर आहे. भारत बायोटेकने तयार केलेल्या लसीला जागतिक आरोग्य संघटने कडून मान्यता मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
‘बायोलॉजिकल ई’ बरोबर करार
हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल-ई लिमिटेड’ सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दीड हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम कंपनीला दिली आहे. सध्या ही लस तिसऱ्या फेजच्या ट्रायल मध्ये आहे.