परवानगीसाठी : कराड तहसिल कचेरीवर गाढवांसह मोर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील नांदलापुर व पाडळी केसे येथे वडार समाजाला दगड खाणपट्टा व माती उत्खननाची परवानगी मिळावी, यासाठी आज शुक्रवारी येथील तहसिल कचेरीवर वडार समाजाने गाढवासह मोर्चा काढला. त्यानंतर प्रशासनास आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चाची दखल न घेतल्यास महसूल मंत्री व पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निवेदन द्यावे लागेल असा इशाराही मोर्चेकर्‍यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नांदलापूर व पाडळी (केसे) येथे दगड व माती उत्खननाचा परवाना वडार समाजास मिळणे बाबत दि. 15 ऑगस्ट रोजी आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी यांनी दि.13 रोजी पत्र देवून त्यासंदर्भात तहसिलदार यांनी कार्यवाही करावी असा आदेश दिला होता. मात्र आदेश देवूनही तहसिलदार यांनी सदर खाणपट्याची मोजणी झाले नसलेबद्दल व मोजणी झालेशिवाय कारवाई करता येणार नाही असे कळविले आहे. सदर खाणपट्याची कोल्हापूर येथील पथकाने मोजणी केल्याचे दिसून येत आहे. अशा परस्थितीमध्ये तहसिलदार हे आम्हास व जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा चुकीचा अहवाल देवून आम्हा वडार समाजास खाणपट्टा देण्याचे टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आमचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

आमचे आजच्या मोर्चाची दखल घेवून आम्हास खाणपट्टा देणेबाबत व खोरे-पाटी, वाळू, गाढवामार्फत वडार समाजास उदरनिर्वाहासाठी काढण्यास परवानगी देण्यात यावी. या मोर्चाची दखल न घेतल्यास महसूल मंत्री, पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवून निवेदन द्यावे लागेल. याची आपले प्रशासनाने नोंद घ्यावी. या निवेदनावर काकासो उर्फ संजय चव्हाण, जयवंत पवार, सूर्यकांत पवार, विलास नलवडे, शुभम कुसाळकर, तानाजी भोसले, सुरेश नलवडे, बजरंग भोसले, राजेंद्र जाधव यांच्या सह्या आहेत.