शिक्षकांनो बदलीसाठी 27 जूनपर्यंत ॲपवर माहिती भरा : विनय गाैडा

सातारा | जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेत बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना 27 जूनपर्यंत ऑनलाइन ॲपवर माहिती भरण्याची मुदत दिली आहे, असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे.

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कुठेही तक्रार राहू नये, यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे आणि एका शाळेत पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. बदलीपात्र शिक्षकांना 50 शाळांचा पसंतीक्रम देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुगम आणि दुर्गम शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घोषित केली आहे. प्रत्येक शिक्षकाला ऑनलाइन माहिती भरण्याचे आदेश शासनाकडून असून, शिक्षकांची प्रोफाईल तयार करण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. ही माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्यात येणार असल्याने कोणता शिक्षक कोणत्या शाळेत किती वर्षे आहे, याची संपूर्ण माहिती शासनाकडे राहणार आहे.

या बदली प्रक्रियेत जिल्ह्यात एकूण 7 हजार 173 प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी किती शिक्षकांच्या बदल्या होणार, याची उत्सुकता लागली आहे. आपसी, विनंती आणि प्रशासकीय बदल्या पहिल्यांदाच अॅपद्वारे होत आहेत. जन्मदिनांक, नावे, नेमणूक दिनांक बदल आदी 123 तांत्रिक हरकती शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. या हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू आहे