कराड | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. एस. होरे यांनी सुनावली. तसेच दंड न भरल्यास साधा कारावासाची शिक्षाही न्यायालयाने दिली आहे. दरम्यान शिक्षा ऐकतच आरोपीला चक्कर आल्याने तो जाग्यावरच थांबल्याचे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले. अधिक गोविंद जाधव (वय- 30) असे शिक्षा मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले की, फिर्यादी कामावर गेल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी भावासह शाळेतून तांदूळ आणण्याकरता गेली होती. तांदूळ घेतल्यानंतर पीडित मुलीने भावाला शाळेसमोर सोडून ती झेरॉक्स आणण्यासाठी गेली. ती परत आलीच नाही. म्हणून तिची चौकशी केल्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी तपास करून संशयितास ताब्यात घेऊन अटक केली होती. पोलिसांच्या तपासात संबंधित मुलीवर आरोपीच्या घराच्या मागील शेडमध्ये अत्याचार करून शरीर संबंध ठेवल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच पीडित मुलीस आरोपीने अंकलेश्वर गुजरात, रांजणगाव पुणे अशा विविध ठिकाणी पळवून नेले होते. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यातील कपडे जप्त केली होती. तसेच वैद्यकीय अहवाल मिळवला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. एस. तलबार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावरून कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. एस. होरे यांच्या समोर हा खटला सुरू होता. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. राजेंद्र सी शहा यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण पाच साक्षीदार तपसले. तसेच न्यायालयासमोर सादर केलेल्या साक्षी पुराव्यावरून न्यायालयाने संशयितास बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार वीस वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावासाची शिक्षाही देण्यात आली आहे. अॅड. राजेंद्र सी. शहा यांना अंमलदार अशोक मदने, रामचंद्र गोरे, अर्चना पाटील, गोविंद माने, योगिता पवार, शिंदे, घोरपडे, प्रमोद पाटील, प्रकाश कार्वेकर, धनचंद्र पाटील यांनी सहकार्य केले.