सातारा | शाहूपुरीजवळ आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा मारून लाकडांची विनापरवाना अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह सुमारे ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा प्रल्हाद वसंतराव शेंडगे (रा. गडकर आळी, सातारा) आणि बाजीराव प्रकाश लोंढे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. वन विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख सचिन डोंबाळे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांना बेकायदा लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे आंबेदरे (ता. जि. सातारा) येथे सापळा लावण्यात आला. लाकूड मालाची विनापरवाना अवैध वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर (क्र. एमएच – 11- G- 4543, ट्रॉली क्र. एमएच-11 आर- 670) व पिक अप (क्र. एमएच- 11 टी- 2564) अशी दोन वाहने वन विभाग भरारी पथकाने ताब्यात घेतली आहेत.
याप्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील कारवाई भरारी पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल दिपक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल राजेश विरकर, सुहास पवार, वनरक्षक विजय भोसले यांनी केली. मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, ड्रोंगो संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे व ओंकार ढाले यांनी त्यांना सहकार्य केले.