वनविभागाची कारवाई : मांडूळ जातीते साप विकणाऱ्या तिघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खंडाळा | शिरवळ येथील शिरवळ – लोंणद रस्त्यावर असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरात जिवंत मांडूळ विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे. रवींद्र कंगाळे, अनिकेत यादव, संतोष काटे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार मांडूळ साप हा शेड्युल 4 मध्ये येत असून सातारा वनविभागाने ताब्यात घेतलेले जिवंत मांडूळ इंडियन सँड बोआ (शास्त्रीय नाव – एरिक्स जॉनी) प्रजातीचे असून त्याची लांबी 141 सेंमी तर वजन सव्वादोन किलो आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे बुधवार, दि. 19 रोजी काहीजणांनी जिवंत मांडूळ जातीचे साप विक्री करण्यासाठी पकडले असून ते आजच विक्री करणार आहेत, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे मिळाली होती. याची माहिती भाटे यांनी याची माहिती वनक्षेत्रपाल (फिरते पथक सातारा) सचिन डोंबाळे यांना तत्काळ दिली. हे मांडूळ विक्री करण्यासाठी काही संशयित शिरवळ – लोणंद रोडवरील पशुवैद्यकीय कॉलेज परिसरात सांयकाळी पाच वाजता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे वनक्षेत्रपाल सचिन डोंबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावला.

वनविभागाचे पथक येथे असतानाच तिघे संशयित पाच वाजता एका दुचाकी (एमएच ११ – बीएफ २९५४)वरून आले. त्यांचे वर्तन संशयास्पद असल्यामुळे त्यांना तत्काळ ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेले ‘इंडियन सँड बोआ’ प्रजातीचा मांडूळ साप मिळून आला. यावेळी या तिघांनी आपली नवे रवींद्र महादेव कंगाळे (वय 42, श्रीरामनगर, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा), अनिकेत तात्यासो यादव (वय 24, रा. कवठे-मसूर, ता. कराड, जि. सातारा), संतोष दिनानाथ काटे (वय 42, रा. भांबे, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) अशी सांगितली. या तिघांना ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी, व तीन मोबाईल संच तसेच एक जिवंत मांडूळ हस्तगत केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कारवाईत वनक्षेत्रपाल (फिरते पथक) सचिन डोंबाळे, खंडाळा वनक्षेत्रपाल महेश पाटील, वनपाल दीपक गायकवाड, राहुल जगताप वनरक्षक विजय भोसले, आंनदा जगताप, पोलीस कॉन्स्टेबल सुहास पवार, चालक दिनेश नेहरकर आदी सहभागी झाले होते. दरम्यान, या घटनेचा पुढील पंचनामा व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया खंडाळा वनक्षेत्रपाल महेश पाटील यांच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Leave a Comment