नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील अजनी या ठिकाणी स्टार कासवांची तस्करी होत असल्याची टीप वनविभागाला मिळाली. यानंतर त्यांनी या माहितीच्या आधारे सापळा रचून तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना त्यांच्याकडील मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. 24 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून स्टार प्रजातीचे 6 कासव जप्त करण्यात आले आहेत. आरोपींवर वन्यजीव अधिनियम 1972 च्या विविध कलमांद्वारे वनगुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या तस्करीप्रकरणी नागपुरातील दुर्गेश रामअवध शुक्ला, शुभम कैलास पुलेवार व शिवम राजकुमार अवस्थी या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींविरोधात वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कोणी केली कारवाई
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईक, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार यांच्या मागदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, एल. व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, सेमिनरी हिल्स सारिका वैरागडे, नीलेश तवले, महादेव मुंडे, योगेश ताडाम, मारोती मुंडे, किशोर चव्हाण व कल्याणी तिवडे यांनी केली आहे. त्यांना मानद वन्यजीव रक्षक नागपूर, अंजिक्य भटकर, स्वप्निल बोधाने व पीपल्स फॉर अॅनिमल सदस्य अंकित खलोंडे यांनी या कारवाईसाठी सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे हे करीत आहेत.
वनकर्मचाऱ्यांपुढे आव्हान
कासव ही एक दुर्मिळ प्रजाती आहे. याची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने हि तस्करी केली जाते. त्यामुळे याला आळा घालणे हे वनकर्मचाऱ्यांपुढे मोठा आव्हान आहे.