कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील बेलवडे हवेली हद्दीत असलेल्या हॉटेल राऊमध्ये एक वन्य पक्षी घार ही पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच कराड येथील वन अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तसेच एका पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्यात आलेल्या घारीला ताब्यात घेतले. याप्रकरणी हॉटेल मालक विवेक रामचंद्र देशमुख यांना वनविभागाने नोटीस बजावली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग एनएच 4 वर बेलवडे हवेली हद्दीत असलेल्या हॉटेल राऊमध्ये घार पिंजऱ्यात बंदिस्त ठेवण्यात आली होती. याबाबतची माहिती पुणे येथील मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी याची माहिती उपवनसंरक्षक सातारा यांना दिली.
उपवनसंरक्षकानी याबातचा योग्य तो तपास करण्याच्या सूचना कराड येथील परिक्षेत्र वनाधिकारी कराड तुषार नवले, वनरक्षक रमेश जाधवर यांना दिल्या. यानंतर संबंधित वनाधिकाऱ्यांनी तत्काळ हॉटेलवर छापा टाकला. या छापेमारीत एका पिंजऱ्यात बंदिस्त स्वरूपात एक घारठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी त्या घारीला ताब्यात घेतले असून हॉटेल मालक विवेक रामचंद्र देशमुख यांना नोटीस बजावलेली आहे.