निगडीत विहिरीत पडलेल्या जखमी सांबराला जीवदान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा तालुक्यातील निगडी येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल 8 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी झाल्याने सांबर विहिरीत पडले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निगडी येथील शिवारातील एका विहिरीमध्ये सांबर पडल्याची माहिती गावातील ग्रामस्थांना समजली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ वन रक्षक राजू मोसलगी यांना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता दिली. वन विभागाचे रेस्कू पथका घटनास्थळी दाखल झाले. आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल 200 ते 225 किलो वजनाचा नर जातीच्या सांबराला विहिरीतून दोरखंड व रेस्कु जाळीचा वापर करून बाहेर काढले.

विहिरीतून बाहेर काढलेल्या सांबराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या मागील उजव्या पायात शिकारीसाठी वापरण्यात येणारा फासा अडकलेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्या पायातील फासा काढून टाकत जखमांवर मलमपट्टी करत उपचार करण्यात आले. सब्रुवर पार्थमिक उपचार केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्याला सोडून देण्यात आले.

या सांबराला जीवदान देण्यामध्ये वनविभागाचे वन क्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे,  वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक राजू मोसलगी, सुहास भोसले, महेश सोनवले, श्रीकांत दुर्गे, गोरख शिरतुडे, शैलेश देशमुख, सुमित वाघ, दिपक मच्छे तसेच निगडी चे सरपंच सुभाष शामराव पवार, धनंजय बबन पवार, अण्णा मारुती जाधव, सागर प्रकाश मसुगडे, तुषार विजय पवार, प्रदीप तुळशीदास जाधव, रोहित व्यंकट पवार, महेश धनाजी भोईटे, प्रीतम आप्पासो पवार यांनी परिश्रम घेतले. बचावकार्य सहायक वन संरक्षक सुधीर सोनवले, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.

सांबर हा एक हरीण वर्गातील प्राणी असून हा हा भारत देशात आढळतो. या जातीचे नर प्राणी 185 ते 260 किलो वजनाचे असतात. सप्टेंबर ते जानेवारी या काळात यांचा प्रणयकाळ दिसून येतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्सरवेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेने या जातीचे अस्तित्व असुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे. ज्या मागचे प्रमुख कारण हे मानवाचा निसर्गातील वाढता हस्तक्षेप तथा शिकार आहे.