अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्याची तात्काळ माहिती आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. त्याअनुषंगाने नासाच्या संकेतस्थळावर अमरावती विभागात आतापर्यंत ७५ टक्के वनकर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांनी जानेवारीमध्ये विभागीय वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वनवणवा नियंत्रणाबाबत सूचना केल्या. या बैठकीत वनरक्षक ते मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यक्षेत्राची नोंदणी नासाच्या संकेतस्थळावर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. आता ही नोंदणी युद्धस्तरावर सुरू असून, वनवणवा नियंत्रणासाठी १५ फेब्रुवारी ते १५ जून २०२० या दरम्यान सजग राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत. जंगल किंवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास वनकर्मचाºयांना मोबाइलवर ‘रियल टाइम डेटा’ मिळेल.
वनवणवा नियंत्रणासाठी विभागीय, जिल्हा व तालुकास्तरावर आग प्रतिबंधक स्वतंत्र चमू तैनात आहे. आतापर्यंत जंगलातील आगीची माहिती डेहराडून येथील भारतीय वन सर्वेक्षण संस्था देत होती; पण ती आग लागल्यानंतर दोन ते अडीच तासांनी मिळायची. नासाकडून मात्र उपग्रहाद्वारे आगीची माहिती क्षणात मिळणार आहे. अशी माहिती अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी दिली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.