सकलेन मुलाणी । कराड
कराड। सध्या कोरोनाचा कहर सर्वत्र जाणवत आहे, कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अश्यावेळी बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करणे आवश्यक असते. परंतु सद्य परिस्थितीत उपलब्ध कोरोना रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर अभावी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत अश्या परिस्थितीत माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून आपल्या स्थानिक विकास निधीमधील ६० लाख रुपयांचा निधी कोरोनाच्या युद्धासाठी मंजूर केला आहे. या निधीमधून २ रुग्णवाहिका व १० व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत.
मंजूर २ रुग्णवाहिका या कराड व मलकापूर नगरपरिषदेस दिल्या जाणार आहेत व १० व्हेंटिलेटर कराड येथील स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयास तसेच इतर कोरोना रुग्णालयास दिले जाणार आहेत.
माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजपर्यंत सातत्याने लोकपयोगी उपक्रमात आघाडीने सहभाग घेतला आहे. त्यांनी मतदारसंघातील जनतेशी थेट भेटीपासून ते मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत अश्या विविध प्रकारे जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पृथ्वीराज बाबा कोरोना काळात आग्रही राहिले आहेत.
कोरोना काळात लोकप्रतिनिधी या नात्याने पृथ्वीराज बाबांनी वेळोवेळी गरजेचे सर्व उपक्रम मतदारसंघात राबविले आहेत. यामध्ये गरजू लोकांना अन्न धान्याचे वाटप केले गेले, गावागावांमध्ये स्वतः जाऊन कोरोनाबाबत जनजागृती करणे असेल, तसेच रेशन दुकानांमधून धान्यांचे योग्य प्रकारे वितरण होते का यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी स्वतः भेट देत रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरणाबद्दल माहिती घेत जनतेची विचारपूस केली यावेळी वितरणातील ज्या त्रुटी आढळल्या त्या त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देऊन मार्गीत करण्यात आल्या.
याचसोबत राष्ट्रीय प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध माध्यमांच्या द्वारे प्रश्न विचारून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच प्रसंगी केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांना पत्रे पाठवून जनहिताच्या कामासाठी अग्रेसर राहिले आहेत. पृथ्वीराज बाबा यांनी लॉकडाऊन च्या काळात सर्वसामान्य जनतेसाठी राज्य सरकार व प्रशासनाला सूचना देत मतदारसंघात मायक्रो कंटेन्टमेंट झोन राबविणे, अत्यावश्यक सेवा किमान वेळेत सुरु करणे अश्या महत्वाच्या गोष्टीं सुचविल्या व त्याची अंमलबजावणी साठी अग्रेसर राहिले यामुळेच जनतेला लॉकडाऊन काळात किमान सुविधांचा अभाव जाणवला नाही याचे समाधान जनतेमधून व्यक्त होत आहे.