लातूर । राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असताना राजकीय वर्तुळातील व्यक्तींही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून निलंगेकरांना प्रकृतीचा त्रास जाणवत होता. त्यांना सर्दी, खोकलाही होता. त्यामुळं त्यांनालातूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात आली होती. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, लातूर आरोग्य विभागाने ही माहीती अधिकृत असल्याचे सांगितले आहे. त्यांचे वय अधिक असल्यामुळे कुटुंबाकडून यापूर्वीच काळजी घेण्यात आली होती.
निलंगेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले असून कोरनाबाधित असल्याची पोस्ट सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. कोरोना संसर्गातून ते लवकरच बरे होतील अशी अपेक्षा कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”