… म्हणून सचिन पायलट समर्थक गटाने ठोठावला आता हायकोर्टाचा दरवाजा

जयपूर । राजस्थानमधील राजकीय नाट्य अजून संपलेले नसून काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट याच्या गटाने आता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्षांनी सचिन पायलट गटाला व्हिपचे पालन न केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. मात्र ही नोटीस अवैध असल्याने ती लागू होत नाही असा दावा करत या नोटिशीला सचिन पायलट गटाने राजस्थान हायकोर्टात आव्हान दिले आहे. सदर नोटिसीविरोधात हायकोर्टात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे हायकोर्टात सचिन पायलट गटाती बाजू मांडणार आहेत. तर विधानसभा अध्यक्षांची बाजू अभिषेक मनु सिंघवी हे मांडणार आहेत.

जेव्हा विधानसभा सुरू नसते तेव्हा अशी नोटीस विधानसभा अध्यक्ष बाहेरून देऊ शकत नाहीत, असे पायलट गटाचे म्हणणे आहे. या कारणामुळे ही नोटीस कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही, असे पायलट गटाचे म्हणणे आहे. या प्रकणावर राजस्थान हायकोर्टात आज ३ वाजता सुनावणी होत आहे. हायकोर्टाचे न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा हे या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत.

अनुभवी वकील मुकुल रोहतगी हे सचिन पायलट गटाची बाजू मांडत असल्याने या गटाची ही जमेची बाजू असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी राज्यघटना वाचलेली दिसत नाही. अशा प्रकारे देण्यात आलेली नोटीस कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही. हेच या नेत्यांना माहीत नाही, असा टोला पायलट गटाच्या आमदारांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. दरम्यान आज दुपारी ३ वाजता होणारी ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.