नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या (CBI) संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुबोध कुमार जैस्वाल यांची निवड केली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीश रमन आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. त्यांनी आज जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुख पदी दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.
IPS Subodh Kumar Jaiswal has been appointed as Director of Central Bureau of Investigation (CBI) for a period of 2 years pic.twitter.com/jFGwZbOen4
— ANI (@ANI) May 25, 2021
जयस्वाल हे महाराष्ट्र कॅडरचे 1985 बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते सीआयएसएफचे संचालक म्हणून नियुक्त होते. मंत्रिमंडळ नियुक्ती समिती नुसार जयस्वाल हे लवकरच सीबीआयचा पदभार स्वीकारणार आहेत. यात ऋषि कुमार शुक्ला यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून सीबीआयचे संचालक पद रिक्त होतं. अतिरिक्त संचालक प्रवीण सिंह यांच्याकडे त्याचा पदभार देण्यात आला होता. सीबीआयच्या संचालक पदाच्या निवडीसाठी समितीची जवळपास 90 मिनिटे चर्चा सुरू होती. त्यामध्ये चौधरी यांनी निवड प्रतिक्रियेवर आक्षेप नोंदवला होता.
सुबोध कुमार जैस्वाल यांनी महाराष्ट्रातील पोलीस खात्याची संपूर्ण माहिती आहे. फेब्रुवारी 2019 ते जानेवारी 20२१ म्हणजे जवळपास दोन वर्षांचा त्यांचा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा अनुभव आहे. ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते. सुबोध कुमार जैस्वाल यांनी महाराष्ट्र एटीएस दहशतवादविरोधी विभागातही काम केले आहे. महाराष्ट्रातील 20 हजार कोटींचा बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे सुबोध कुमार जैस्वाल हे प्रमुख होते. त्यांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी केली आणि सर्व धागेदोरे समोर आणले. मालेगाव मध्ये सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशीही जयस्वाल यांनी केली आहे. त्यावेळी जयस्वाल हे महाराष्ट्र एटीएसचे उपमहानिरीक्षक होते.